गेले काही दिवस शहरात सुरू असलेली रस्ता रुंदीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सकाळी महापालिका आयुक्तांनी भायंदर पाडा येथील खेळाच्या मैदानाजवळील विकास आराखडय़ातील रस्ता ४० मीटर व ३० मीटर रुंद करणे, वेदांत रुग्णालय ते विहंग व्हॅली हा रस्ता ४० तर त्यालगतचा रस्ता ३० मीटर रुंद करणे, भक्ती पार्कमागील ग्रॅन्ड स्वेअर संकुल ते पार्क वूड संकुल रस्त्याचे ३० मीटर रुंदीकरणाची कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे सुभाष पथ, छत्रपती शिवाजी पथ, स्थानक परिसर रस्ता, मो. ह. विद्यालय आदी ठिकाणी भेट देऊन तेथील रस्त्यात आलेली सर्व वाढीव बांधकामे तोडण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना शहर विकास विभागाला दिल्या.