पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘हॅण्डवॉश’ यंत्रे; शाळांतील स्वच्छतागृहांतील अस्वच्छता मात्र बेदखल

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांच्या इमारतींची दुरवस्था, स्वच्छतागृहांतील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची तोंडदेखली व्यवस्था, अपुऱ्या वर्गखोल्या, शिक्षकांना बसण्यासाठी जागा नसणे अशा सुविधांची बोंब असताना महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी चक्क हात धुण्याचे यंत्र आणि द्रवरूप साबण उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. हात धुण्याच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहील, असा हेतू या निर्णयामागे सांगितला जात आहे. मात्र शाळांतील मूलभूत सुविधा बेदखल असताना केवळ हात धुण्याच्या सुविधेसाठी सव्वा कोटी खर्च करण्याचा हा निर्णय म्हणजे ‘हातसफाई’ नाही ना, असा सवाल व्यक्त केला जात आहे.

ठाणे महापालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा एकूण ७८ इमारतींमध्ये भरतात. त्यापैकी काही शाळा इमारतींची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी यापूर्वी पुढे आल्या आहेत. तसेच अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अपुऱ्या वर्गखोल्या, शिक्षकांना बसण्यासाठी जागा नसणे अशा सुविधांची बोंब असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या मूलभूत सुविधांवर भर देण्याऐवजी महापालिका शिक्षण विभागाकडून मात्र विविध योजना राबविल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी हर्बल हॅण्डवॉश जेल आणि त्यासाठी लागणारे यंत्र खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादरकेला आहे.

या प्रस्तावानुसार शाळा इमारतींमधील प्रत्येक मजल्यावरील स्वच्छतागृहाशेजारी किमान २९० हर्बल हॅण्डवॉश यंत्रे बसविण्यात येणार आहेत. या एका यंत्रामध्ये एक हजार मिली हर्बल हॅण्डवॉश जेलचे पाऊच असणार आहे. या यंत्रामधून एका वेळेस वापरादरम्यान एक मिली इतके जेल बाहेर पडणार असून हे पाऊच संपल्यानंतर त्यामध्ये पुन्हा जेल भरले जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या १२० प्राथमिक आणि २१ माध्यमिक शाळा आहेत. त्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या एका यंत्रामध्ये एक हजार मिली दोन पाऊच प्रत्येक महिन्याला लागतील, असा अंदाज आहे. शाळा दहा महिने सुरू असतात. त्यामुळे प्रत्येकी ५८० पाऊच याप्रमाणे दहा महिन्यांकरिता एकूण ५८०० पाऊच लागणार आहेत, असे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. या योजनेकरिता दोन वर्षांसाठी एक कोटी ३९ लाख रुपये इतके पैसे खर्च केले जाणार आहेत. यंत्र वॉरंटीमध्ये असल्यामुळे बदलून दिले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागून त्यांचे आरोग्य सुदृढ राहील, असा दावा प्रशासनाने प्रस्तावात केला आहे.