अपंग पुष्पासमोर आता पॅरा ऑलिम्पिकचे ध्येय

आधीच आपल्याकडे महिलांना अबला म्हटले जाते. त्यात एखादी मुलगी जन्मत:च अपंग असेल तर बहुतेकदा तिच्या उत्कर्षांच्या वाटा बंदच केल्या जातात. पालक एक तर सरळ दुर्लक्ष करतात किंवा अतिकाळजीमुळे तिला स्वत:च्या क्षमता आजमावून पाहण्याची संधीच देत नाहीत. अंबरनाथमधील    या मुलीच्या बाबतीत सुदैवाने असे काही घडले नाही. डाव्या हाताने अधू असूनही तिच्या आई-वडिलांनी तिला अ‍ॅथलेटिक्स खेळण्याची परवानगी आणि प्रोत्साहन दिले आणि पुष्पानेही आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. अवघ्या सव्वा वर्षांत अ‍ॅथलेटिक्समध्ये विशेष प्रावीण्य मिळवीत लांब उडी क्रीडा प्रकारात तिने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले. आता २०२० मध्ये टोकियो इथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी ती सराव करीत आहे.

अंबरनाथच्या होली फेथ स्कूलमध्ये नवव्या इयत्तेत शिकणारी पुष्पा चौधरी दाम्पत्याची थोरली मुलगी. दोन लहान भाऊ, आई आणि वडील असे त्यांचे कुटुंब. वडील रामलाल चौधरी यांचा छोटा व्यवसाय आहे. एका हाताने जन्मत:च अधू असणारी पुष्पा अतिशय चपळ आहे. त्या जोरावर लांब उडीत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या पुष्पाने अवघ्या वर्षभरात तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामधून चमकदार कामगिरी बजावली. जयपूरमध्ये गेल्या मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या १७ व्या राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडीत तिने सुवर्णपदक पटकाविले. त्या स्पर्धेत तिने ४.११ मीटर इतकी लांब उडी मारली. अंबरनाथमध्ये लांब उडीच्या सरावासाठी खास सुविधा नसतानाही तिने हे यश मिळविले हे विशेष. त्यातही जिल्हास्तरापर्यंतच्या स्पर्धेत सर्वसाधारण मुलींशी स्पर्धा करून तिने विजेतेपद मिळविले होते. शहरात अ‍ॅथलेटिक्सचा सराव करण्यासाठी फारशी सोय नाही. त्यासाठी लागणारी आवश्यक साधने नाहीत. सध्या ती कानसई येथील भाऊसाहेब परांजपे शाळेच्या मैदानात क्रीडा प्रशिक्षक दिनेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली इतर मुला-मुलींसोबत सराव करते.

कौतुक, प्रोत्साहन आणि मदत

पुष्पाने मिळविलेल्या यशाबद्दल ती राहत असलेल्या शिवशक्तीनगरमधील रहिवाशांना विशेष कौतुक आहे. ‘तिच्या पुढील कारकीर्दीसाठी आमच्या शुभेच्छा आहेतच, शिवाय त्यासाठी तिला लागणारी सवरेतपरी मदत आम्ही करू,’ असे येथील रहिवासी अरुणा जोशी यांनी सांगितले.

अवघ्या सव्वा वर्षांच्या कारकीर्दीत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविणारी पुष्पा अतिशय गुणी खेळाडू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिने भाग घ्यावा आणि देशासाठी पदक मिळवावे, अशी आमची सर्वाची इच्छा आहे.

दिनेश सिंग, प्रशिक्षक.