सिगारेट विझवण्यासाठी पालिकेने वाटलेले रक्षापात्र विद्युत डीपीलगत

ठाणे : ठाणे महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील दुकाने, पान विक्रेत्यांना मध्यंतरी राखपात्र देण्याचा निर्णय घेतला. सिगारेट फुंकणाऱ्या व्यक्तींनी राख रस्त्यावर न टाकता या पात्रांमध्ये टाकावी असे गृहीत धरण्यात आले होते. मात्र ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील काही पान विक्रेत्यांनी हे राखपात्र चक्क लगतच असलेल्या विद्युत डीपी बॉक्सला अडकविल्याने या भागात दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई असतानाही हा नियम सर्रास धाब्यावर बसवला जातो. ठाणे स्थानक परिसरातही हेच चित्र दिसून येते. अनेकजण येथे पान, गुटखा, सिगारेट यांसारखे अपायकारक पदार्थाची सर्रासपणे विक्री करतात आणि सेवनही करताना दिसतात. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पत्रक, फलक या माध्यमातून धूम्रपानाविरोधात मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जाते. तसेच यंदा पालिकेने येथील पान विक्रेत्यांना सिगारेटची राख टाकण्यासाठी राखपात्र (अ‍ॅश ट्रे) देऊन जनजागृतीचा वेगळा पर्याय निवडला. मात्र हा पर्याय धोकादायक ठरू पाहात आहे.  ठाणे रेल्वे परिसरातील एका पान विक्रेत्याने हे रक्षापात्र त्याच्या दुकानासमोरील विजेच्या डीपी बॉक्सला अडकवण्यात आले आहे. धूम्रपान करून झाल्यावर जळती सिगारेटची थोटके या पात्रात टाकली जातात. त्यामुळे एखादी जळती सिगारेट या डिपी बाक्सच्या संपर्कात आल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, स्वच्छ भारत अभियान आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी एका सामाजिक संस्थेने या राखपात्रांचे वाटप केले. मात्र या रक्षापात्राचा चुकीच्या पद्धती वापर होऊन त्यापासून दुर्घटना होऊ शकते, असे निदर्शनास आल्यास त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल,  माहिती ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

दुर्घटना निश्चित.

विद्युत प्रवाह वितरण करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी डीपी बॉक्स बसविण्यात येतात. एखादा ज्वलनशील पदार्थ किंवा आगीसदृश वस्तू या डीपी बॉक्सच्या संपर्कात आल्यास येथे आग लागून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.