डोंबिवली स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने बाजीप्रभू चौकातील प्रसिद्ध हनुमान मंदिराचे स्थलांतर करण्याचे ठरविले आहे. येत्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली. सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मंजुरी मिळताच मंदिराच्या स्थलांतराविषयी पावले उचलली जातील. मंदिराच्या विश्नस्तांनी मंदिराची पुनर्बाधणी करून देण्याची मागणी केली आहे. स्थलांतर आणि पुनर्बाधणीसाठी योग्य जागा मिळताच ही प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
शहरातील मुख्य चौकातील वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर मंदिराचे स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही, असे महापालिकेतील वरिष्ठ अभियंत्यांचे मत आहे.
हे लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनानेही महापालिकेस सहकार्य करण्याचे ठरविले आहे. मंदिराचे पुजारी दिनेश कुलकर्णी यांनी महापालिकेला पत्र दिले असून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने जर मंदिराची पुनर्बाधणी करून दिली तर स्थलांतर करण्यास हरकत नसल्याचे त्या निवेदनात म्हटले आहे. डोंबिवली शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सदानंद थरवळ तसेच माजी आमदार हरिश्चंद्र पाटील हे गेली पाच वर्षांपासून मंदिराच्या स्थलांतरासाठी पाठपुरावा करत होते. मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, महापालिकेने मंदिर बांधून दिल्यास त्याचे स्थलांतर करण्यास कुलकर्णी यांनी लेखी संमती दिली आहे. उपकार्यकारी अभियंता प्रशांत भुजबळ याविषयी म्हणाले, हा प्रश्न धोरणात्मक असल्याने महासभेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून महासभेच्या निर्णयानंतर कारवाई करण्यात येईल.