मकरसंक्रांतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. परंतु ग्राहकांना पायपीट करावी लागू नये यासाठी वसईतील काही महिला बचतगट या समाजमाध्यमांच्या साहाय्याने मकरसंक्रांतीनिमित्त लागणाऱ्या तिळगुळापासून ते अगदी वाण विक्रीचा प्रचार करीत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी दुकानांमधून एकाच ठिकाणी सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनाही ही खरेदी सोयीची होत असून बचत गटातील महिलांनादेखील याचा फायदा होत आहे.

मकरसंक्रांत हा महिलांसाठी महत्त्वाचा सण आहे. या निमित्ताने महिलावर्गाकडून मोठय़ा प्रमाणात तिळगूळ, वाण, हलव्याचे दागिने यांची खरेदी केली जाते. मात्र वसई, नालासोपारा, विरार इत्यादी परिसरातील महिला बचतगट मकरसंक्रांतीनिमित्त तिळगूळ, हलव्याचे दागिने, वाण देण्यासाठी पिशव्या, तोरणे, हळद-कुंकवाच्या पुडय़ा बनविण्याची कामे गेल्या महिन्याभरापासून करत आहेत. या निमित्ताने त्यांना व्यवसायाची चांगली संधी उपलब्ध झाली असून त्याचा फायदा घेत अनेक महिलांनी बचत गटाद्वारे आपले छोटे मोठे विविध घरगुती व्यवसाय थाटले आहेत.

विरार येथे राहणाऱ्या स्मिता वाळिंबे यांनी संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने बनविण्याचे काम हाती घेतले आहे. स्त्रियांच्या दागिन्याच्या संचात हलव्याच्या बांगडय़ा, हार, मंगळसूत्र, बाजूबंद, छल्ला, अंगठी, गजरे आणि यांसह इतर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असून यांचे मूल्य ६५० ते ७०० रुपयांपर्यंत आहे. तर पुरुषांच्या दागिन्यांच्या संचाची किंमत ही ४०० रुपयांपर्यंत आणि लहान मुलांच्या संचाची किंमत २०० ते २५० रुपयांपर्यंत आहे.

स्वप्रेरित महिला बचत गटाद्वारे मनाली सहस्रबुद्धे या  तिळाचे लाडू, तिळाच्या वडय़ा, तिळकूट बनवले असून वाण देण्यासाठी मेथीचे लाडू, बेसनाचे लाडू, गोडा मसाला, चहाचे मसाले, हळदी-कुंकवाचा खण आणि पिशवीच्या आकर्षक आकारातील पुडय़ा, बुके,  नारळाच्या वडय़ा, आल्याच्या वडय़ा यादेखील वाण देण्यासाठी बनवत आहेत. वस्तूखरेदीपेक्षा खाद्यपदार्थ वाण म्हणून देण्यासाठी जास्त मागणी असल्याचे मनाली यांनी सांगितले. तसेच याच बचत गटातील विरार येथे राहणाऱ्या रंजना आंबडस्कर यांनी इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचे काम हाती घेतले असून विविध काळ्या रंगाची ज्वेलरी त्या बनवून विकण्यास ठेवल्या आहेत. यामध्ये काळ्या रंगाचा नेकलेस, बांगडय़ा, चेन, पेंडंट, मंगळसूत्र, कानातले हेदेखील बनवले जात आहेत. तर विरार येथील राहणाऱ्या माला हरिया या छोटय़ा पर्सपासून मोठय़ा पर्स वाण देण्यासाठी बनवत आहेत.

मानसी भट या डिझायनर गिफ्ट बनवत असून त्यात छल्ला, तोरण, पर्स, केसाची वेणी, रांगोळी यांचा व्यवसाय थाटला आहे.

((   वसई-विरार येथील महिला बचत गटांनी एकत्र येत संक्रांतीनिमित्त तिळगुळ हलव्याचे आकर्षक दागिने, वाण देण्यासाठी पिशव्या अशा प्रकारच्या विविध वस्तू तयार केल्या असून बाजारात या वस्तूंना मोठय़ा प्रमाणात मागणी होत आहे.  ))