07 March 2021

News Flash

अवजड वाहने पुन्हा मोकाट!

वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे नोकरदारांना त्रास

वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे नोकरदारांना त्रास

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होत असताना ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांमधील समन्वयाच्या अभावामुळे सोमवारपासून ठाणे-बेलापूर रस्ता, पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच शहरांमधील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे. टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या या वाहनांच्या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नव्हते. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतरही ही वाहने मोकाट वाहतूक करत असून त्यात नोकरदारांच्या वाहनांची भर पडल्याने वाहतूक कोंडीत वाढ होऊ लागली आहे.

उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून दिवसाला सुमारे हजारो अवजड वाहने गुजरात तसेच भिवंडी आणि ठाण्याच्या दिशेने ये-जा करत असतात. या अवजड वाहनांमुळे शहरात दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. ही कोंडी कमी करण्यासाठी काही वर्षांपासून ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टाळेबंदीच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्ते मोकळे होते. शहरात अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांनाही परवानगी असल्याने या वाहनांची वाहतूक दिवसरात्र सुरू झाली होती.

टाळेबंदी सोमवारपासून शिथिल झाल्याने अनेकजण कल्याण, डोंबिवली या भागातील अनेकजण त्यांची खासगी वाहने घेऊन ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने निघाले. रेल्वे गाडय़ा सुरू नसल्याने तसेच ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक मंद असताना अवजड वाहनांची वाहतुकीत भर पडल्याने दोन दिवसांपासून वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाल्याचे चित्र होते. त्यामुळे कल्याण-शिळफाटा मार्गावर वाहतूक कोंडी वाढल्याचे चित्र आहे. तसेच भिवंडी शहरातही आता वाहतूक कोंडी वाढू लागली आहे.

पूर्वीचे नियम लागू करण्याची गरज

निर्बंध शिथिल होत असताना होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासंबंधी ठाणे, नवी मुंबई पोलिसांचे कोणतेही नियोजन नसल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. रेल्वे वाहतूक ठप्प असल्यामुळे रस्त्यांवर वाहनांचा भार वाढला आहे. त्यातच अवजड वाहनांची वाहतूक कोणतेही नियम न पाळता सुरू आहे. पूर्वीच्या नियमांची आखणी होणे आवश्यक असताना ठाणे, नवी मुंबई पोलिसांनी त्याकडे लक्ष पुरविले नाही. त्याचा फटका मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना बसत असून सकाळी गर्दीच्या वेळेत टोलनाका तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

अन्य शहरांमुळे भार

नवी मुंबई, पालघर, ठाणे ग्रामीण हद्दीतून ही अवजड वाहने ठाणे पोलिसांच्या हद्दीत प्रवेश करतात. त्यामुळे तेथील पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करून ही अवजड वाहने थांबविण्यासंदर्भात सूचना करणार आहोत. तसेच यापुढे अवजड वाहनांनी बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्यास त्यांना थांबविण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

दुर्गाडी पुलाजवळ वाहतूक कोंडी

दुर्गाडी पुलाजवळ राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आलेली आहे. हा मार्ग कल्याण, बदलापूर, मुरबाड या भागातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र, या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने सकाळी सुमारे अर्धा तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 3:34 am

Web Title: harassment of employees due to lack of transportation planning zws 70
Next Stories
1 कोविड रुग्णालयांत स्थानिक रुग्णांना प्राधान्य
2 खासगी वाहतूकदारांचे नोकरदारांना प्रवासाचे ‘पॅकेज’
3 करोनामुळे ओढवलेल्या मंदीत रोजगाराची संधी
Just Now!
X