ग्रामीण भागातील रहिवासी हैराण; शासकीय कामांनाही फटका

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि विशेषकरून ग्रामीण भागातील अनेक स्वयंघोषित गाव पुढारी गाव परिसरात दहशत माजवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.  स्थानिक महसूल, पोलीस यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक रहिवाशांना त्याचा प्रचंड ताप आणि त्रास सहन करावा लागत आहे.

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून ग्रामपंचायतीत गाव समित्या तयार केल्या आहेत. या समित्यांमधील काही सदस्य टाळेबंदी राबविण्याचे, गावावर हुकूमशाही गाजविण्याचे आपणास सर्वाधिकार दिले आहेत, अशा थाटात दिवसभर गावात, गावाच्या वेशीवर दहशत माजवताना दिसू लागले आहेत. बाहेरून गावात येणारे रस्ते बांबू, दगड लावून बंद करण्यात आले आहेत. यामुळे गावातील गर्भवती, कर्करुग्ण, अति गंभीर रुग्णाला तालुक्याच्या ठिकाणी उपचाराला न्यायचे असेल तर ग्रामस्थांना त्या रुग्णाला एक ते दोन किमीचे गावातील अंतर चालून मुख्य रस्ता गाठावा लागतो. गावातील अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी ठाणे, मुंबईत दुचाकी, चारचाकी वाहनाने जातात. त्यांनाही गावातील मुख्य रस्ते बंद केल्याने शेत-माळरानातील रस्त्यावरून पुढचा प्रवास करावा लागतो. अनेक गावांमध्ये करोनाबाधित, संशयित रुग्ण नाही.

या गावांमधील कोणीही रहिवासी मुंबई, कल्याण, ठाणे येथे नोकरीला जात नाही. तरीही करोनाचा बागुलबुवा करून ग्राम सदस्य अनाठायी बागुलबुवा करीत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या ग्राम सदस्यांना विरोध केला तर वादाचे प्रसंग उद्भवतील त्यामुळे कोणी या विषयावर बोलत नाही.

टाळेबंदीची नियमावली ठरलेली असताना हे ग्राम सदस्य दर आठवडय़ाला नवीन नियम गावात काढून गावातील सर्व दुकाने पाच दिवस कायमस्वरूपी बंद ठेवणे, गावात कोणालाही येऊ न देणे. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्याला गावाच्या प्रवेशद्वारावर अडविणे असे प्रकार करत आहेत. शहापूर तालुक्यातील एका गावात मुख्य रस्ता बंद केल्याने एका वृद्ध कर्करोग रुग्णाला वाहनातून राज्य रस्त्यावर उतरून मग एक किमीचे अंतर गावात पायी जावे लागले.

गावांच्या हद्दीत साकव, पूल, रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. त्यांना गावबंदीचा त्रास होत आहे. गावाचे नियंत्रण ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे असते. तेही गावातील स्वयंघोषित पुढाऱ्यांपासून त्रास नको म्हणून शांत राहणे पसंत करतात. हे गाव दहशतीचे प्रकार शहापूर, मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुरू आहेत.

शहरी भागातही मनमानी

असाच प्रकार कल्याण, डोंबिवली शहर, ग्रामीण भागात काही अतिउत्साही मंडळींनी केला आहे. आपल्या हद्दीतील रस्ते या मंडळींनी बांबू, दगडी लावून बंद केले आहेत. दारू दुकान दुकानदाराने उघडू नये म्हणून दुकानाचे लोखंडी दार बांबू-काठय़ांनी बांधून टाकण्यात आले आहे. डोंबिवली एमआयडीसी भागात मोठाली रुग्णालये आहेत. विविध भागांतून येथे रुग्ण येतात. या भागातील गल्लीबोळ असेच दगड, विटा रचून बंद करण्यात आले आहेत. शिळफाटा सेवा रस्ता अनेक ठिकाणी बंद केला आहे. त्याला रुग्णवाहिका घेऊन येणाऱ्या चालकांना वळसा घेऊन रुग्णालय गाठावे लागते. अशा उत्साही मंडळींचा शहरी भागात पालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त, ग्रामीण भागात तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.