हरिहर निवास, डोंबिवली (पूर्व)

आता सर्वत्र काँक्रीटच्या घरांचा सुळसुळाट असला तरी लाकडी घरात राहण्याची ऐट आणि मौज काही वेगळीच असते. डोंबिवलीतील हरिहर निवास या वास्तूने आजूबाजूला सिमेंट, गगनचुंबी इमारतींचे जंगल वाढत असताना आपले नैसर्गिक, निवांत लाकडी अस्तित्व अजूनही टिकून आहे. येथील रहिवासीही आमची चाळ म्हणजे आमचे नंदनवन आहे, अशा थाटात या ठिकाणी शांत, निवांतपणे राहत आहेत.

मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आपण गिरगावमध्ये आहोत की काय असा आभास होतो. चाळीच्या बाहेर दुतर्फा वाहनांचा सकाळपासून कल्लोळ, गजबजाट. मात्र एकदा चाळीच्या प्रवेशद्वारातून आत शिरले की निरव शांतता. जणू काही आसपास रस्ते, मनुष्यजीवनच नाही. रात्री दिव्यांच्या प्रकाशात या इमारतीचे रूप अधिकच खुलून निघते. ही इमारत डोंबिवली पूर्वेत सतत ठणठणाट असणाऱ्या रेल्वे स्थानकाजवळ आहे, यावर विश्वास बसत नाही.

डोंबिवली पूर्वेतून शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोरून रस्ता ओलांडून मोनिका अ‍ॅनेक्स या दुकानाजवळील लोखंडी प्रवेशद्वारातून आत जायचे. समोरच ‘एल’ आकाराची लाकडी दोन माळ्यांची प्रशस्त चाळ दृष्टीस पडते. ‘हरिहर निवास’ म्हणून ही चाळ ओळखली जाते. १९५३ पासून ही वास्तू आपले अस्तित्व टिकवून आहे. हिरालाल ठक्कर चाळीचे मालक. आता त्यांची पुढची पिढी या वास्तूची मालक आहे. साठ वर्षांपूर्वी डोंबिवली एक लहान गाव. आजूबाजूला शेती, खाडीचे पाणी, दलदल, मुबलक जमीन असे चित्र होते. कल्याण शहर जवळ होते. वखारीतून मुबलक सागवान लाकूड मिळत होते. हिरालाल यांनी सागाच्या लाकडाचा वापर करून कुशल कारागीर सुतारांच्या हातून या चाळीची उभारणी केली आहे. या वास्तूचे लाकडी बांधकाम वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. खांबांच्यावर उभ्या केलेल्या चाळीच्या पायापासून ते अढय़ापर्यंत (छत) सागवान लाकडाचा हात राखून न ठेवता वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ६० वर्षांनंतरही लाकडाला कोठे छिद्र, टोस, वाळवी लागल्याचे दिसत नाही. चाळीमधील जिन्यांसाठी, पायऱ्यांसाठी लाकडी फळ्या आहेत. जिन्याच्या फळ्या झिजल्यासारखे वाटते, पण चालताना आपण एका लवचीक वस्तूवरून चालतो असा भास होतो. एखाद्या ७० ते ८० वर्षांच्या व्यक्तीने व्यायामाचा भाग म्हणून चाळीतील दोन माळ्याचे जिने चढउतार केले तरी त्याला कोणताही त्रास होणार नाही, असे अंगावर न येणारे जिने येथे पाहण्यास मिळतात. जिन्याचे हातखांब, जिना चढताना पायऱ्या आणि हातखांबाच्या मध्ये बसविलेल्या कोरीव पट्टय़ा सुताराच्या कल्पकतेचे दर्शन घडवितात.

चाळीत एकूण २७ बिऱ्हाडं (कुटुंब) आहेत. प्रशस्त दोन खोल्यांची रचना. दर्शनी भागात ऐसपैस गॅलरी. गॅलरीला साडेचार फूट उंचीचा संरक्षित कठडा. जुन्या खरमरीत पद्धतीच्या लाद्या या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा लाद्या घराला असणे म्हणजे हल्लीच्या कार्पोरेट युगात कमीपणा समजला जातो. मात्र या लाद्यांवरून ये-जा करताना अगदी लहान बाळ, वृद्ध आजोबा, आजी जरी ओले पाय घेऊन धावत गेले तरी त्यांना काही होणार नाही, अशी रचना पूर्वीपासून चाळीत आहे.

चाळीचे छत पूर्ण लाकडी कडीपाटाने आच्छादित आहे. छतावर कौले आहेत. अडगळ ठेवण्यासाठी पोटमाळ्याची व्यवस्था आहे. त्यामुळे हवेत थंडी, ऊन नाहीतर पाऊस असो, घरातील वातावरण संतुलित राहते. पावसाळ्यात छतावरून पडणाऱ्या पावसाचा थेंब कुणाच्याही घरात पडू नये म्हणून छताच्या आतील भागाला सागवान फळ्यांचा कडीपाट आहे.

चाळीच्या भिंतीत खूप प्रयत्न करूनही खिळाही ठोकला जात नाही. आवारातील विहीर म्हणजे पोहण्याची प्रशिक्षणशाळा होती. परिसरातील मुले विहिरीत पोहण्यासाठी यायची. मालक हिरालाल यांनी हरिहर निवास ही चाळ उभारली. त्यानंतर त्यांचा भरभराटीचा काळ आला. त्यामुळे हिरालाल या चाळीला लक्ष्मीसमान मानतात. या वास्तूमुळे आपली भरभराट झाली आणि पुढचा प्रवास सुखाचा झाला.

त्यामुळे या वास्तूची देखभाल, दुरुस्ती ते नियमित करतात. येथील रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची ते काळजी घेतात. हिरालाल यांची मुलेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत या चाळीकडे पाहत आहेत. रेल्वे स्थानकाजवळील जागांना आता अफाट किंमत आहे. या ठिकाणी एखादा भूमिपुत्र मालक असता तर त्याने भाडेकरूंना हैराण करून जागा खाली करून चांगला २७ माळ्यांचा गगनचुंबी टॉवर उभारला असता. पण, ठक्कर कुटुंबीय या विचारापासून कोसो दूर आहेत. येथील रहिवासी, येथली शांतता, पावित्र्य हीपण आपली एक संपत्ती आहे, असा ठक्कर कुटुंबीयांचा दावा आहे. येणाऱ्या काळात या जागेत नवीन गगनचुंबी इमारत उभी राहावी असा विचार येथील मालकाच्या, त्यांच्या मुलाच्या आणि रहिवाशांच्या मनातही येत नाही, असे रहिवासी सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.

कधीकाळी वीज पुरवठा खंडित झाला तरी येथील रहिवाशांचा जीव मेटाकुटीस येत नाही. कारण चाळ उभारताना हवा खेळती राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता उघडलेली घराची दारे रात्री अगदी बारा वाजेपर्यंत उघडी असतात. त्यामुळे चाळीत कोण येतंय कोण गेलंय यावर सर्व रहिवाशांचे लक्ष असते. चाळीच्या आवारात प्रशस्त दीडशे ते दोनशे फुटांची मोकळी जागा आहे. या जागेत मुले खेळतात. आजी, आजोबा बाकडय़ांवर बसून गप्पा मारतात. आवारात औदुंबर व अन्य झाडे आहेत. औदुंबराच्या झाडाखाली आढळून आलेल्या महादेवाच्या मूर्तीची या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. चाळीतील ज्येष्ठ नागरिक मंदिराभोवती संध्याकाळच्या वेळेत देवनाम घेत बसलेली असतात.

चाळीचा जोता उंच असल्याने पाच पायऱ्या होत्या. बाजूला उंच सपाट उतार देण्यात आला होता. हा उतार म्हणजे अनेक र्वष लहान मुलांच्या घसरगुंडीचे साधन होते.

नामवंतांचे वास्तव्य

चाळीत साठ वर्षांपूर्वीपासून मंत्रालयातील शिक्षण विभागातील सचिव ज. बा. कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते नाना अनगळ, डॉ. श्रीराम (रामकाका) कुलकर्णी, बाबूराव गायकवाड, डॉ. अंजली आपटे, पुष्पा बाबर अशी विविध क्षेत्रांतील मंडळी एकजीवाने राहत होती. चाळीतील स्वच्छता व पावित्र्य राखले पाहिजे म्हणून मराठी माणसांव्यतिरिक्त कोणा व्यापारी व्यक्तीला मालक हिरालाल यांनी कधीच चाळीतील जागा निवास किंवा व्यापाऱ्यासाठी दिली नाही. ज. बा. कुलकर्णी मंत्रालयात अधिकारी पदावर काम करताना सामाजिक, साहित्यिक अशा अनेक प्रांतांत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या घरी सतत बैठका होत असत. सकाळी नऊ वाजता चहाचे पातेले शेगडीवर ठेवले की रात्री नऊ वाजेनंतर ते खाली उतरविण्यात येत होते. चाळ माणसांनी सतत भरलेली असे, असे आशा कुलकर्णी यांनी सांगितले. प्रा. प्रवीण दवणे उमेदीच्या काळात आपल्या नवकविता बाबांना (ज. बा.)दाखविण्यासाठी येत असत, असाही अनुभव कथन करण्यात आला. पूर्वी डोंबिवली मोकळी होती. घरातून डोंबिवली रेल्वे स्थानक दिसत असे. घरातून लोकल येत असल्याचा सिग्नल दिसला की मग चाळीतील नोकरदार मंडळी घरातून बाहेर पडत असत. रेल्वे स्थानकातून बाहेर पडलेली प्रत्येक व्यक्ती दिसून यायची. आपल्या घरी कोणी पाहुणा येणार असेल तर तो रस्त्यावरूनच दिसायचा, असे आशा कुलकर्णी सांगतात.

उत्सवांचा उत्साह

चाळीत कोणताही सण, उत्सव, घरगुती लग्नसमारंभ असला की अख्खे कुटुंब म्हणून चाळकरी त्या समारंभात सहभागी होतात. १९६२ पासून चाळीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. ३५ र्वष या उत्सवाचे कुलकर्णी कुटुंबीय नियोजन करतात. विद्यार्थ्यांसाठी सरस्वती पूजन, तुळशी विवाह सोहळा, नवरात्रोत्सव साजरा केला जातो. होळीच्या दिवशी रंगाचे पिंप करून त्या प्रत्येकाला यथेच्छा बुडवायचा. रात्रीच्या वेळेत लगोरी, लिंबू सरबताचा बेत असायचा. जूनचा पहिला पाऊस अंगावर घेण्यासाठी अख्खी चाळ बाहेर पडायची. मग वाफाळलेला भजीचा बेत असायचा. दरवाजा बंदिस्त ही संस्कृती चाळीत नाही. त्यामुळे सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रत्येक जण एकमेकाला ‘कसे आहात’ करीत येजा करीत असतो. अडचणींच्या प्रसंगी एकमेकांना मदतीचा हात दिला जातो.   या चाळीचे नाव ‘हरिहर’ असले तरी खरोखर येथील रहिवाशांसाठी जीवन म्हणजे ‘शांतिवनातील निवांत सुखी जीवन’ आहे.