आमदार, आयुक्त यांचा आवेश ओसरल्याची टीका

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीनंतर डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शहरातील फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावरून महापालिका आयुक्त गोिवद बोडके यांना फैलावर घेतल्याने महिनाभरापूर्वी महापालिकेने रस्ते, पदपथ, स्कायवॉक अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. मात्र, आमदारांचा आक्रमक पवित्रा आणि पालिका आयुक्तांची तत्परता ओसरताच फेरीवाल्यांनी पुन्हा स्कायवॉकवर बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे.

डोंबिवली स्थानक परिसरात महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी भर रस्त्यात हाणामारी करणाऱ्या फेरीवाल्यांची चित्रफीत प्रसारित झाली होती. या प्रकारानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी महापालिका आयुक्त गोिवद बोडके यांना लक्ष्य करत ‘फेरीवाल्यांना आवर घालणे शक्य होत नसेल तर बदली करून घ्या’ अशा शब्दात दरडावले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांनीही प्रशासनाला सूचना देत फेरीवाले हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली. शहराच्या सर्वच प्रभागांत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश प्रभाग आधिकाऱ्यांना देण्यात आले होते. अधिकाऱ्यांना पोलिसांच्या मदतीने फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत मोठय़ा प्रमाणात साहित्य जप्त केले होते. तसेच काही दिवस फेरीवाल्यांविरोधात दररोज कारवाई करण्यात येत असल्याने फेरीवाल्यांनी शहरात दुकाने थाटणे बंद केले होते. मात्र, ही मोहीम थंडावताच फेरीवाले पुन्हा शिरजोर होऊ लागले आहेत.

डोंबिवलीत पूर्वेकडे जोडणाऱ्या स्कायवॉकवर आणि कल्याण स्थानकातील पश्चिमेकडे असणाऱ्या स्कायवॉकवर मोठय़ा प्रमाणात फेरीवाले दुकाने थाटत असून या दुकांनामुळे अर्ध्याहून अधिक स्कायवॉक अडवला जात आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेचे एक पथक रेल्वे स्थानक परिसरात सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी येते. मात्र, पथक निघून गेल्यानंतर फेरीवाले पुन्हा दुकाने थाटत आहेत. याबाबत महापालिका साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

दीडशे मीटरचा नियम धाब्यावर

दोन वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे  कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या बाहेर महापालिकेतर्फे १५० मीटरचा नियम लागू करण्यात आला आहे. या ना फेरीवाला क्षेत्रात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी आहे. मात्र, फेरीवाले रेल्वेच्या पादचारी पुलांना जोडल्या गेलेल्या स्कायवॉकवरच दुकाने थाटत असून १५० मीटरचा नियम धाब्यावर बसवत आहेत.

महिनाभरापूर्वी महापालिकेने शहरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली होती. मात्र, स्कायवॉकवर पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. त्यामुळे स्कायवॉकवर चालण्यास अडचण निर्माण होत आहे. महापालिकेने या फेरीवाल्यांवर कायमस्वरूपी कारवाई करणे गरजेचे आहे.

– ऋतिक कदम, डोंबिवली.