कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉक भागात फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडले आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसर, स्कायवॉकवरून फेरीवाल्यांचे उच्चाटन करा, असे आदेश आयुक्त ई. रवींद्रन यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. फेरीवाला हटाव पथकाच्या दुर्लक्षामुळे स्कायवॉकवर पुन्हा फेरीवाले बसत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

नागरिकांना रेल्वे स्थानक भागातून मोकळेपणाने चालता यावे म्हणून स्कायवॉकची उभारणी करण्यात आली आहे. दोन वर्षांपासून स्कायवॉकच्या मुख्य वर्दळीचा भाग फेरीवाल्यांनी ताब्यात घेतला आहे. पालिका अधिकारी, कर्मचारी, रेल्वे पोलीस यांच्या संगनमताने स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा राजरोस धंदा सुरू आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यात यावा म्हणून गेल्या वर्षभरात अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. न्यायालयात जाण्याचा इशारा दिला तरी त्याला फेरीवाले आणि या फेरीवाल्यांचे समर्थन करणारे अधिकारी दाद देत नसल्याने आमदार पवारांचाही नाईलाज झाला आहे.
आयुक्त ई. रवींद्रन यांच्या आदेशामुळे स्कायवॉक, कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांना हटविण्याचा देखावा क प्रभाग अधिकाऱ्यांनी केला. एक दिवस आयुक्त स्कायवॉकची पाहणी करण्यासाठी आले होते. त्या काळात स्कायवॉक फेरीवालामुक्त ठेवण्यात आला होता. दररोज आयुक्त रेल्वे स्थानक भागात येत नाहीत पाहून फेरीवाले पुन्हा स्कायवॉकवर ठाण मांडू लागले आहेत. या भागातील पदपथावरील टपऱ्या तोडण्याचे आदेश क प्रभाग अधिकारी भरत जाधव यांना आयुक्तांनी दिले होते. ती जबाबदारी जाधव यांनी योग्य रीतीने पार पाडली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आयुक्तांनी किमान आठवडय़ात एकदा गुपचूप रेल्वे स्थानक भागाला भेट द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांकडून दर महिन्याला सुमारे अडीच लाखांची दौलतजादा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती काही फेरीवाल्यांनी दिली आहे.