18 January 2019

News Flash

फेरीवाले उदंड!

प्रवाशांना सोयीचे ठरावे यासाठी स्थानक परिसर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील पदपथ काबीज; न्यायालयाचे आदेश, आयुक्तांच्या घोषणा वाऱ्यावर

ठाणे : पदपथ किंवा मिळेल ती जागा अडवून तेथे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होऊ लागल्याच्या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी फेरीवाल्यांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करून दिली होती. त्यानुसार फेरीवाल्यांची हद्द निश्चित करून पालिका प्रशासनानेही तातडीने कारवाई केली होती. मात्र, या कारवाईचा जोर ओसरताच ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत फेरीवाल्यांनी पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील गोखले रोड, राम मारुती मार्ग अशा महत्त्वाच्या रस्त्यांसह कल्याण, डोंबिवली या रेल्वेस्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला फेरीवाल्यांविरोधात कठोर भूमिका घेणारे ठाणे महापालिकेचे आयुक्तसंजीव जयस्वाल आणि कडोंमपाचे आयुक्त गोविंद बोडके यांनी या अतिक्रमणाकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये ठाण्याचा समावेश होत असल्याने वर्षभरापूर्वी महापालिकेने प्रवाशांना सोयीचे ठरावे यासाठी स्थानक परिसर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याच भागात रस्ते रुंदीकरणाची मोहीम धडाक्यात राबविण्यात आली. त्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जातीने लक्ष घालत प्रवाशांना चालण्यासाठी पदपथ, रस्ते मोकळे राहतील यासाठी प्रयत्न केले. स्थानक परिसरातील वाहतुकीत सुसूत्रता यावी यासाठी पावले उचलली. जयस्वाल यांच्या या भूमिकेचे ठाणेकरांनी स्वागत केले. मात्र, गेल्या महिन्यापासून आयुक्तांचे या परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या भागात फेरीवाल्यांना रान मोकळे करून दिल्यासारखे चित्र दिसत आहे. सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होत असताना जागोजागी फेरीवाले वाट अडवून बसत असल्याचे चित्र दिसत असून या फेरीवाल्यांना कारवाईचे कोणतेही भय राहिलेले नाही.

रेल्वे स्थानकांपासून दीडशे मीटपर्यंतच्या अंतरात फेरीवाल्यांना मनाई असल्याचा निर्णय मध्यंतरी उच्च न्यायालयाने जाहीर केला. त्यानुसार पांढरे पट्टेही मारण्यात आले. मात्र, या पट्टय़ांचा नियम सर्रासपणे मोडला जात असून स्थानक परिसराकडे जाणाऱ्या पादचारी पुलावर फळविक्रेते, भाजीविक्रेते यांची पूर्वीपेक्षा अधिक गर्दी होताना दिसत आहे. स्थानक परिसरापाठोपाठ गोखले मार्ग, राम मारुती रोड या भागांतही फेरीवाल्यांचे जथे दिसू लागले असून हे वाढते अतिक्रमण पाहून रहिवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. रेल्वे स्थानक परिसराबाहेर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांचे बस्तान उठवण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथके सतत कार्यरत आहेत. कारवाईदरम्यान अनेक फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचा माल जप्त केला जातो. आतापर्यंत सुमारे २७ फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– परशुराम कुमावत, वॉर्ड अधिकारी, कडोंमपा

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई होत असते. महापालिकेचे कारवाई पथक या ठिकाणी कारवाईसाठी फिरत असते. फेरीवाल्यांकडून माल जप्त केला जातो.

– अशोक बुरपुले, अतिक्रमण विभाग अधिकारी, ठाणे महानगरपालिका

First Published on May 15, 2018 3:01 am

Web Title: hawkers encroachment on footpath in thane kalyan and dombivli