22 September 2020

News Flash

कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांची ‘घुसखोरी’

मुंबई, ठाणे पालिकेकडून रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना हटविण्याची नियमित कारवाई सुरू आहे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ठाणे, कळवा, मुंबईतील शेकडो फेरीवाल्यांचा कल्याणकडे प्रवास

मुंबईतील दादर परिसर, ठाण्यातील कळवा, मुंब्रा भागातून फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई मुंबई, ठाणे पालिकांकडून सुरू आहे. या सततच्या कारवाईमुळे अस्वस्थ झालेले ठाणे, मुंबई परिसरातील सुमारे ५०० ते ६०० फेरीवाले व्यवसाय करण्याचे सुरक्षित ठिकाण म्हणून कल्याण, डोंबिवली पालिकेच्या हद्दीत येऊन ठाण मांडू लागले आहेत. डोंबिवली पूर्व भाग हा व्यवसायाच्या दृष्टीने सुलभ असल्याने बहुतांशी घुसखोर फेरीवाले डोंबिवलीत स्थिरावले असल्याचे चित्र आहे.

मुंबई, ठाणे पालिकेकडून रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना हटविण्याची नियमित कारवाई सुरू आहे. या शहरांमध्ये वर्षांनुवर्ष व्यवसाय करणारे फेरीवाले धंदा बुडत असल्याने अस्वस्थ झाले आहेत. रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची सवय जडल्याने अशा प्रकारचा व्यवसाय बिनधोकपणे कल्याण, डोंबिवलीत करता येईल, असा संदेश या फेरीवाल्यांपर्यत पोहचविला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील फेरीवाल्यांचे जथ्थेच्या जथ्थे कल्याण, डोंबिवलीत स्थिरावत असून महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून व्यवसाय करताना दिसत आहेत.

व्यवसायही आणि निवाराही

डोंबिवलीत आयरे, कोपर भागात कमी किमतीत निवासासाठी खोली मिळते. घर ते रेल्वे स्थानकापर्यंत मालाची ने-आण करणे यामुळे सुलभ जाते. तसेच, पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांना एकदा ‘बांधून’ घेतले की हटविण्याची कारवाई फारशी होत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे स्थानिक फेरीवाल्यांच्या बाजूलाच हे घुसखोर फेरीवाले व्यवसाय करीत आहेत, असे चित्र आहे. आपल्या गावाकडचा नातेवाईक आपल्याजवळ व्यवसाय करीत असल्याने, परप्रांतीय फेरीवाले घुसखोर फेरीवाल्यांबाबत चक्कार शब्द काढत नाहीत. घुसखोर फेरीवाल्यांची सर्वाधिक घुसखोरी डोंबिवली पूर्वेतील नेहरू रस्ता, फडके रस्ता, उर्सेकरवाडी, चिमणीगल्ली, कामत मेडिकल पदपथ भागात झाली आहे. डोंबिवली पूर्व भागातील रस्ते, पदपथ सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत सध्या फेरीवाल्यांनी गजबजून गेले आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ते नाहीत. पालिकेच्या ग आणि फ प्रभागात फेरीवाल्यांना हटविण्यासाठी एकूण ३० ते ३५ कामगार आहेत. या दोन्ही विभागांना दोन पथकप्रमुख आहेत. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यासाठी दोन वाहने आहेत. परंतु, फेरीवाल्यांची संख्या वाढूनही या दोन्ही विभागातील फेरीवाला हटाव पथकांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसणार नाही, अशी कारवाई ‘ह’ प्रभागातील पथकाकडून केली जाते. मग, अशी कारवाई पूर्व भागात का केली जात नाही, असा नागरिकांचा प्रश्न आहे.

आयुक्त आक्रमक

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ पादचाऱ्यांसाठी खुले असले पाहिजेत. फेरीवाले हटत नसतील तर पालिकेच्या आठ प्रभागांमधील फेरीवाला हटाव पथकातील सर्व कामगार, पथक प्रमुख, त्यांची वाहने एकत्रित करून, मग पोलीस बंदोबस्तात कारवाई करा. एकही फेरीवाला ना फेरीवाला हद्दीत दिसणार नाही, अशाप्रकारचे नियोजन करा, अशी आक्रमक भूमिका पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतली आहे. या सर्व व्यवस्थेवर प्रभाग अधिकारी नियंत्रण ठेवण्यास टंगळमंगळ करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून डोंबिवलीतील ग, फ, ह आणि ई प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील सर्व कामगार, पथक प्रमुख दररोज संध्याकाळी सहा ते नऊ वेळेत एकत्रितपणे डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करणार आहेत. फेरीवाल्यांची कोणत्याही प्रकारची पाठराखण पालिकेकडून केली जाणार नाही. उर्वरित वेळेत ही पथके स्वतंत्रपणे आपल्या प्रभागात फेरीवाल्यांना हटविण्याची कामे करतील.

– सुरेश पवार, उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:02 am

Web Title: hawkers from thane kalva and mumbai feel safe in kalyan for business
Next Stories
1 उल्हासनगर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव
2 ठाण्यात जयस्वाल यांच्या वाढदिवसाचा उत्सवी थाट
3 नालासोपाऱ्यात दिवसाढवळया एका व्यक्तिची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
Just Now!
X