डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सर्व फेरीवाले मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा संकुलाजवळील टाटा लाइनखाली स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात सकाळ, संध्याकाळ कारवाई करूनही फेरीवाले हटत नसल्याने प्रशासनाने फेरीवाला धोरणाचा आधार घेऊन रेल्वे स्थानक भागातून टाटा लाइनखाली जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

डोंबिवली पश्चिमेतून फेरीवाले रेल्वे स्थानक भागातून हद्दपार करण्यात आले आहेत; परंतु पूर्व भागात गेल्या ३० वर्षांपासून फेरीवाले एकाच जागी व्यवसाय करीत असल्याने ते हक्काची कमावती जागा सोडण्यास तयार नाहीत. पालिकेचे ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक प्रभाग अधिकारी, सकाळ, संध्याकाळ या फेरीवाल्यांना हटविण्याचे, त्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई करीत आहेत. जे फेरीवाले उद्दामपणा करीत आहेत; त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कारवाई करून पथक पालिकेत गेले की पुन्हा फेरीवाले रस्ते, पदपथावर बसत आहेत.

या फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी जूनमध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेने डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागात एक खासगी सुरक्षा नियुक्ती करून बॉक्सरच्या माध्यमातून फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला होता. ढिम्म व निष्क्रिय प्रशासनाने या विषयावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून केडीएमटीची बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

बस सेवा सुरू करून त्यालाही फेरीवाले अजिबात जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केडीएमटीची बस मुकाटय़ाने केळकर रस्त्याने आणून इंदिरा चौकातून मार्गस्थ करण्यात येत आहे.

कार्यालयीन कामकाज करायचे की आठ तास रस्त्यावर उभे राहून फक्त फेरीवाल्यांना हटवायचे या निष्कर्षांप्रत प्रशासनातील अधिकारी आले आहेत. फेरीवाल्यांचे दुखणे कायमचे संपवायचे असेल तर फेरीवाल्यांना रेल्वे स्थानक पासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या कस्तुरी प्लाझा जवळील दोनशे ते तीनशे मीटरच्या टप्प्यात बसवायचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.

वाहतूक विभागाने खासगी कंपन्यांच्या फडके रस्त्यावरून रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या बस बंद केल्या आहेत. त्यामुळे फडके रस्ता सध्या मोकळा श्वास घेत आहे. टाटा लाइनखाली केडीएमटीच्या बस, फेरीवाले एकाच ठिकाणी बसविले तर ग्राहकांची सोय होणार आहे. टाटा लाइनच्या तीनशे मीटरच्या भागाचा सध्या सुमारे दोनशे ते तीनशे दुचाकी, चारचाकी वाहने फुकट उभी करण्यात येत आहेत.