रहिवाशांना धक्काबुक्की, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

रेल्वे स्थानक परिसरातून हटवण्यात आलेल्या फेरीवाल्यांनी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बस्तान मांडल्यामुळे कल्याणमधील पादचारी त्रस्त झाले आहेत. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यांवर फेरीवाल्यांनी हातपाय पसरले असून रहिवाशांना धक्काबुक्की करण्याचे प्रकारही या भागात घडू लागले आहेत.

कल्याण पूर्व परिसरात दाट लोकवस्ती आहे. या भागातील रस्तेही अत्यंत अरुंद आहेत. पालिकेने पदपथांचीही नीटशी व्यवस्था केलेली नाही. रस्त्यांलगत असलेली घरे आणि बेकायदा चाळी यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. असे असताना या रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी आपल्या गाडय़ा उभ्या करण्यास सुरुवात केली असून त्यामुळे कोसळेवाडी तसेच आसपासच्या परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. कल्याण पूर्व भागातील रहिवासी वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना दोन बोगदे ओलांडावे लागतात. या ठिकाणीही मोठय़ा प्रमाणावर फेरीवाल्यांची गर्दी असे. रेल्वे प्रशासनाच्या कारवाईनंतर मात्र येथील फेरीवाल्यांनी अंतर्गत रस्त्यांच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. गणेशमंदिर चौकासमोरील रस्त्यावर तसेच दादासाहेब गायकवाड उद्यान आणि सम्राट अशोक जवळ उतरणाऱ्या स्कायवॉक समोर या फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. या अतिक्रमणामुळे रहिवाशांना चालण्यासाठी रस्ताच शिल्लक राहीला नसल्याचे चित्र आहे.

स्कायवॉकच्या रस्त्यावर नवा बाजार

कल्याण पूर्वेत स्कायवॉक जिथे उतरतो त्या भागात फेरीवाल्यांनी नवा बाजार सुरू केला आहे. महापालिका आयुक्त पी. वेलासरू यांनी शहरातील सर्वच भागांतील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही हा नवा ‘बाजार’ भरला आहे. कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट शहर बनविण्याची भाषा करत निवडणुकांमध्ये मतांचा जोगवा मागणाऱ्या सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनीही याविषयावर मौन धारण केल्याने रहिवासी संताप व्यक्त करत आहेत.

फेरीवाल्याची महिलेला मारहाण

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील हनुमान वाडी परिसरात सिताराम भाऊ  शेलार चाळीमध्ये राहणारी एक ४८ वर्षीय महिला कामावरून परतली असता तिला घरासमोरच एका भाजी विक्रेत्याने गाडी लावल्याचे दिसले. त्यांनी याविषयी जाब विचारला असता, फेरीवाल्याने त्यांना मारहाण केली. महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर याप्रकरणी अदखलपात्र नोंदविण्यात आला. या घटनेविषयी कल्याण शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अरुंद रस्त्यांवरील बाजारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.