कोपरी गावामधील महापालिका शाळेत अत्याचार करू पाहणाऱ्या सुरक्षारक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करीत दहा वर्षांच्या दोन शाळकरी मुलींनी स्वत:चा बचाव केला. शाळा भरण्याच्या वेळेत हा प्रकार घडला असून पोलिसांनी विकास शंकर चव्हाण (३५) या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. तो ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करतो. या मुलींना आपल्या खोलीत नेऊन त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला.

या दोन्ही मुलींनी धाडसाने सुरक्षारक्षकावर लोखंडी रॉडने हल्ला करत सुटका करून घेतली. विकास चव्हाण हा सुरक्षारक्षक मंडळाचा कर्मचारी आहे. कोपरी गावातील महापालिका प्राथमिक विभागाच्या शाळा क्रमांक १६ मध्ये त्याची नेमणूक होती. याच शाळेत दोन्ही मुली पाचवीच्या वर्गात शिकत असून त्या कोपरी परिसरात राहतात. या शाळेत पाचवीचे वर्ग दुपारच्या वेळेत भरतात. नेहमीप्रमाणे दोन्ही मुली सोमवारी दुपारी ११ वाजता शाळेत आल्या. त्या वेळी सुरक्षारक्षकाने दोघींना खोलीत नेऊन अश्लील चित्रफीत दाखवून त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याच वेळी दोघींपैकी एकीने धाडस दाखवत त्याचे पाय खेचले, तर दुसऱ्या मुलीने त्याच्या डोक्यात तेथील लोखंडी गज मारला. त्यानंतर दोघींनी खोलीचा दरवाजा उघडून तेथून स्वत:ची सुटका केली. त्यापैकी एका मुलीने घडलेला प्रकार  आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

मुख्याध्यापिकेसह शिक्षिका निलंबित..

या घटनेची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिकांना सेवेतून निलंबित केले आहे. त्यामध्ये मुख्याध्यापिका अल्पिता तांडेल, शिक्षिका स्मिता सावंत, श्यामल मुणगेकर, आरती तळेकर, माधुरी देशमुख यांचा समावेश आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.  त्याचबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.