29 September 2020

News Flash

शहर शेती : गंध फुलांचा गेला सांगून..

सुगंधात आरोग्य चांगले करण्याचा गुण असतो. त्या त्या ऋतूमध्ये सजीवांच्यामध्ये होणारी शारीरिक कमतरता भरून काढण्याचे काम हा सुगंध करत असतो.

| April 23, 2015 12:19 pm

tvlog05सुगंधात आरोग्य चांगले करण्याचा गुण असतो. त्या त्या ऋतूमध्ये सजीवांच्यामध्ये होणारी शारीरिक कमतरता भरून काढण्याचे काम हा सुगंध करत असतो. त्याचप्रमाणे शरिरात थंडावा निर्माण करणे अथवा उष्णता तयार करण्याचे कामदेखील सुगंध करतो. त्यामुळेच घरात किंवा घराभोवती जर फुलझाडे असतील तर त्याचा उपयोग आपल्यालाच होणार आहे.
वनस्पतींशिवाय पृथ्वीवर असंख्य सजीवांचे अस्तित्व जवळजवळ शून्य आहे. वनस्पती उत्क्रांत होत असताना त्यांनी स्वत:मध्ये बरेच बदल केले. त्यामध्ये प्रामुख्याने परागीभवनापासून स्वत:च्या वंशाची वृद्धी होण्यासाठी बिया लांबपर्यंत जाऊन पडण्यासाठी, किटकांपासून प्राण्यापर्यंत सर्वाना आकर्षित करण्याची रचना केली. हे होण्यासाठी वनस्पतींनी गंध, चव, दिसणे इ. फळ, फूल, आकार, रंग यांची रचना तयार केली. यामुळे बहुतेक सजीव त्यांच्याभोवती असतात. यामधून वनस्पती व सजीवांचे सहजीवन तयार झाले. पाण्यापासून वाळवंटापर्यंत व समुद्रसपाटीपासून साधारण दहा हजार फूट उंचीपर्यंत वनस्पतींमुळे सजीव सृष्टी विकसित झाली.
मानव पंचेंद्रियातून उपभोग घेत असतो. त्याच्यामागे मनसुद्धा असते. मनाच्या आसक्ती मर्यादा नाहीत. या पंचेंद्रियात जीभ व नाक त्यातल्या त्यात उपभोग घेण्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. जीभ व अन्न, नाक व गंध डोळे आणि फुलांचे रंग त्यावर विहरणारी फुलपाखरे, कान व वनस्पतींवर बागडणाऱ्या पक्षांची  किलबिल, हात व स्पर्श मुलायम, खरखरीत, मृदू, कठीण इ.
वनस्पतींचा गंध त्यांच्या पानांतून, खोडातून, मुळातून, फळातून, अस्तित्वातून मिळत असतो.
पानातून- तुळस, पुदिना, कढीपत्ता, दवणा, तमालपत्र, केवडा इ.
फुलातून- गुलाब, मोगरा, जाई, जुई अशा बऱ्याच फुलांमधून.
खोडातून- हा सुगंध उगाळल्याशिवाय जाणवत नाही. यामध्ये चंदन आले, हळद इ.
मुळातून- वाळा, नागरमोथा यांसारख्या औषधी मुळांचा गंध.
फळातून- आंबा, अननस, खरबूज, लिंबू, संत्र इ.
वरील सर्वाचा सखोल अभ्यास केल्यास खूप मोठी यादी तयार होऊ शकते. या सर्व सुगंधामुळे मन प्रसन्न होते. गर्भारशी स्त्रीला वासाने मन भरून येणे सर्वात जास्त समजू शकते. सुगंध देणाऱ्या वनस्पतीत झुडूप, गवत, वेल, वृक्ष आहेत. त्यातील काहींना सावली आवडते तर काहींना रणरणते ऊन. काहींचा गंध वातावरणात भरून राहतो तर काहींचा चुरगळल्याशिवाय येत नाही.
सुगंधात आरोग्य चांगले करण्याचा गुण असतो. त्या त्या ऋतूमध्ये सजीवांच्यामध्ये होणारी शारीरिक कमतरता भरून काढण्याचे काम हा सुगंध करत असतो. त्याचप्रमाणे शरिरात थंडावा निर्माण करणे अथवा उष्णता तयार करण्याचे कामदेखील सुगंध करतो. आजकाल ‘आरोमा थेरपी’चा वापर बऱ्याच शारीरिक व मानसिक रोगांवर उपचारांसाठी होत असतो.
घरामध्ये झाडे लावताना उन्हाच्या उपलब्धतेप्रमाणे लावावीत. यात वेली, झुडूप असे प्रकार असतात. त्यातील काही सावलीतच चांगले वाढतात. आपल्या गॅलरीतील ग्रीलवर आपण वेल सोडून घरात गारवा व सुगंध निर्माण करू शकतो. यात आपण वेलीगुलाब, मोगरा अशी फुलझाडे किंवा जाई, जुई इ. वेल लावू शकतो. गुलाबांमध्ये गावठी वेली गुलाब, ज्यांच्या फुलांचा वापर गुलकंदासाठी करता येतो. यासाठी रोझा मदास्का, बिलायती गुलाबात सुगंधित फुलांच्या डबलडिलाईट, क्रीमझनग्लोरी अशा अनेक जाती उपलब्ध आहेत. गुलाबांना नेहमी नवीन फुटीवरच फुले येतात. यामुळे आपल्या झाडांना सतत फुटी येणे आवश्यक असते. यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी छाटणी करणे व खतांचा वेळोवेळी वापर करावा लागतो. या गुलाबांना प्रामुख्याने हिवाळ्यात जास्त व चांगली फुले येतात.
मोगरा वर्गातील डबल मोगरा, सिंगल मोगरा, मदनबाण यांचे झुडूप किंवा वेली आपल्या गरजेप्रमाणे आपण वाढवू शकतो. यांना उन्हाळ्यात फुले येतात. यांचा सुगंध उष्णता घालवतो. हिवाळ्याच्या शेवटी यांची हलकी छाटणी  करावी. जानेवारीअखेरीस दिवसा पाणी देणे बंद करावे व थोडी काढावीत, यानंतर कुंडीतील वरची माती मोकळी करावी. खत घालून मग पाणी दिले असता नवीन फुटी येतात व त्यांना कळ्या येऊन फुले लागतात. बहुतेक सर्व फुलझाडांना नवीन फुटीवरच फुले येतात. वेल वर्गातील कृष्णकमळ याची पाने जरा मंोठी असतात. त्यामुळे वेल वाढल्यावर घरात थोडा अंधार येण्याची शक्यता असते. कृष्णकमळाचे ५-७ प्रकार मिळतात. यांना मंद सुगंध असतो. यात पांढरा, गुलाबी, जांभळा, लाल रंगाची फुले येतात. याच वर्गात पॅशन फ्रूट नावाचा वेल येतो. याला छोटी फळे लागतात. या फळांपासून सरबत करू शकतो. यांना जवळजवळ वर्षभर फुले असतात. जाई, जुई, सायली, चमेली यांना पांढऱ्या रंगाची फुले येतात. वर्षांतून ३-४ वेळा बहर असतो. त्यांच्या कटिंग/फांद्यापासून नवीन वेल करता येतात. रानजाईला फुलांचे घोस लागतात. त्यावर मधमाशा खूप येतात. काळजी करू नका. या मधमाशा आपल्याला त्रास देत नाहीत, चावत नाहीत. झुडपामध्ये छोटा अनंत, कवठी चाफा, कुता इ. वर्षांतून दोनचार वेळा बहर येतो. यांना थोडे ऊन आवश्यक आहे. कवठी चाफ्यात पांढरा व पिवळा असे दोन प्रकार आहे. पिवळ्या कवठी चाफ्याला दिवसभर सुगंध येतो तर पांढऱ्या कवठी चाफ्याच्या फुलांना सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सुगंध येतो. हा सुगंध आसमंतात पसरतो. पिवळ्या कवठी चाफ्याला परावर्तित सूर्यप्रकाश पुरतो. याची पाने मोठी व तजेलदार असतात, म्हणून झाडसुद्धा छान दिसते. यांची वाढ हळूहळू होते.
कुंती किंवा कामिनी म्हणून एक झुडूप असते, याला बकरीसुद्धा खात नाही. बारीक ५ पाकळ्या असलेल्या पांढऱ्या फुलांचे छोटे छोटे झुबके येतात. सुगंध तीव्र असतो. याची पाने छोटी गर्द हिरवी तजेलदार असतात, त्यामुळे हल्ली ती पुष्परचनेत (बुके) मध्ये फिलर म्हणून वापरतात, तर थाई फूडमध्ये कढीपत्त्यासारखी वापरतात.
सोनटक्का, कर्दळ, रेडजिंजर यांसारख्या कंद असलेल्या फुलांची झाडेसुद्धा कुंडीत छान वाढतात. सोनटक्क्य़ाचे दोन रंग असतात- पांढरा व पिवळा. कर्दळीमध्ये बरेच रंग असतात. रेड जिंजरला नावाप्रमाणे लाल फुले येतात. फुले येऊन गेल्यावर ते झाड कापून टाकावे. जमिनीखाली एका कंदापासून अनेक कंद तयार होतात. कुंडीच्या आकारानुसार त्यात ४ ते ६ झाडे ठेवावीत, उरलेली कापून टाकावीत, नाहीतर फुले उशिरा येतात किंवा येतच नाहीत. कंदामध्ये निशिगंध, ग्लॅडियोला, लीली इ.ची पण लागवड करता येते. निशिगंध किंवा गुलछडी या सुगंधित एकरी व डबल फुलांचे दांडे येतात. खालून वर कळ्या फुलत जातात. कंद वर्गातील फुलांना दोन वर्षांनंतर पाणी देणे बंद करून कंदांना विश्रांती देणे आवश्यक असते (डॉर्मन्सी पीरियड) त्याचप्रमाणे कंदांची खोदून काढून विरळणी करावी लागते.
वृक्षामध्ये बकुळ, सुरंगी, चाफ्यांचे प्रकार जसे की सोनचाफा, पांढरा चाफा, हिरवा चाफा, नागचाफा यांची आता कलमे मिळतात. ही कलमे ४-५ वर्षे आपण कुंडीत ठेवून त्यापासून फुले घेऊ शकतो.
कुंडीतल्या झाडाला जमिनीतील सोनचाफ्यापेक्षा जास्त फुले येतात. झाडाची शेंडा छाटणी व कुंडी बदलताना मुळांची योग्य छाटणी करून आपण यांना ४, ५ वर्षे कुंडीत वाढवू शकतो. यात सुरंगीला जाने-फेब्रुवारीत, बकुळीला वर्षांतून तीनचार वेळा, नाग चाफ्याला वर्षांतून एकदा तर सोनचाफ्याला जवळजवळ वर्षभर फुले येतात. शोभेचे ‘अल्पेनिया’ हे वर्दळ वर्गातील झुडूप सावलीतसुद्धा चांगले वाढते. याची पाने चुरगळून वास घेतल्यास छान सुगंध येतो. गवत वर्गातील गवती चहा, वाळा आपण कुंडीत लावू शकतो.
गवती चहाच्या पातीचा चहात, काढय़ात आपण उपयोग करू शकतो तर वाळ्याच्या मुळांमुळे पिण्याच्या पाण्याला सुगंध येतो, जो खूप थंडावा देतो. उन्हाळ्याच्या दिवसात आपण माठातील पाण्यात याचा वापर करतो. याचे अत्तर व सरबत तर लोकप्रिय आहेच, आपण याला खस म्हणून ओळखतो.
असा वनस्पतींची यादी करू तेवढी थोडी आहे. पर्यावरण, आरोग्य, सुशोभीकरण, सजावट इ. उपयुक्त कामात वेळ घालवण्यासाठी आपल्या घरात झाडे लावून पर्यावरण सुधारण्यात खारीचा वाटा उचलून वातावरण प्रसन्न करण्याचा उपक्रम करू या.
 राजेंद्र भट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 12:19 pm

Web Title: health benefits of flowers around the house
Next Stories
1 कानसेन : ‘टेक्नोसॅव्ही’ टेंबे आजोबा
2 ठाणे पालिकेत पदासाठी नगरसेवकांची मोर्चेबांधणी
3 डोंबिवलीत वाहतूक नियम धाब्यावर
Just Now!
X