पालिकेचे कोटय़वधी रुपये पाण्यात
भाईंदर पूर्व परिसरातील नवघर गावात अडीच वर्षांपूर्वी कोटय़वधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले आरोग्य केंद्र बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे केवळ राजकीय फायद्याकरिता या आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली असल्याचे आरोप करण्यात येत आहे.
भाईंदर पूर्व परिसरातील नवघर गावात मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून २०१७ मध्ये आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. तत्कालीन शिवसेना उपमहापौर प्रवीण पाटील यांच्या निधीतून हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते; परंतु उद्घाटन होऊन अडीच वर्षांहून अधिक काळ होऊन गेला तरी अद्यापही आरोग्य केंद्र बंद स्थितीतच असल्याचे आढळून आले आहे. महानगरपालिकेकडून कोटय़वधी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या आरोग्य केंद्राकडे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी जातीने दुर्लक्ष करत आहेत. तसेच निवडणूक काळात केवळ स्वत:चे वर्चस्व वाढवण्याकरिता राजनैतिक दबावामुळे या आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
पालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविल्या जातात. महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत ९ आरोग्य केंद्रे, २ उपकेंद्रे व १ रुग्णालयांमार्फत आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यात येतात. शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य केंद्राची कमतरता असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. नवघर गावात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राच्या शेजारी पूर्वीपासून एक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. अशा परिस्थितीत त्याच्या शेजारी आणखी एक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचा वापर लवकरात लवकर लोकांसाठी करण्यात यावा याकरिता प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे मत अनिल राणावडे यांनी व्यक्त केले.
नळजोडणीचे काम शिल्लक राहिले असल्यामुळे आजपर्यंत ते आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले नव्हते; परंतु लवकरच काम पूर्ण करून आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल. दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 12:55 am