१४ वर्षांपासून ठराव मंजूर असूनही अंमलबजावणी नाही; तरीही भार पालिकेवर

जिल्हा परिषदेकडून दुर्लक्षित झालेल्या वसई तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा ठराव शासनदरबारी मंजूर होऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या शाळा आणि केंद्राच्या दुरवस्थेत आणखी भर पडत आहे.

वसई-विरार महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी वसई तालुका हा पूर्वीच्या ठाणे जिल्ह्य़ात होता. वसई तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शाळा चालविल्या जातात. मात्र जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. २००२ साली तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख असताना वसई तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालये त्या त्या नगर परिषदांकडे हस्तांतरित करण्याचा ठराव संमत झालेला होता. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे  प्राथमिक आरोग्य केंद्राची तसेच जिल्हा सरकारी रुग्णालयाची दुरवस्थेत आणखी भर पडत आहे. पालिकांनाच या प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार सोसावा लागत आहे.

रुग्णालयाची इमारत अर्धवट

विरारमधील जिल्हा सरकारी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी तीन इमारती सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत बांधण्यात येणार होत्या. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या इमारतींचे काम रखडले आहे. या तीन इमारतींसाठी तब्बल तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. याबाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सेत डॉ. कांचन वणेरे यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ज्या ठेकेदाराला हे काम दिले होते तो एका घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात होता. त्यामुळे काम पूर्ण झाले नाही परंतु लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 ग्रामीण रुग्णालय शहरी भागात का?

एकीकडे ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था समोर येत असताना मुळात हे ग्रामीण रुग्णालय विरारसारख्या शहरी भागात का, असा सवाल करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात मोखाडासारख्या दुर्गम भागात कुपोषणामुळे १४ बालके दगावली आहेत. ग्रामीण भागात ही रुग्णालये नेली तर त्याचा खरा उपयोग तेथील जनतेला होईल, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.