ठाणेकरांच्या आरोग्याची किल्ली आहे, ती वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयांकडे. ठाण्यात १८० वर्षांपूर्वी पहिले रुग्णालय बांधण्यात आले. आता ठाण्यात जागोजागी रुग्णालये आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधाही ठाण्यात उपलब्ध आहेत. रुग्णालयांचा पावणे दोनशे वर्षांतील विकासाचा आढावा..

‘मा झे ठाणे, सुंदर ठाणे, सुदृढ ठाणे’ असे नामफलक चौकाचौकात आपण पहातो. माझे ठाणे सुंदर आहे पण सुदृढ होण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात. ठाण्याच्या आरोग्याची चावी आहे, ती वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या इस्पितळांकडे. ठाण्यातील पहिले इस्पितळ बांधण्यात आले ते ब्रिटिश काळात १८३५-३६ मध्ये. तेव्हा ४ हजार ७३१ रुपये खर्च करून सिव्हिल हॉस्पिटल बांधण्यात आले. त्यानंतर ३० वर्षांनी ठाणे नगरपालिकेचा पहिला सार्वजनिक दवाखाना वाडिया डिस्पेन्सरी या नावाने सुरू झाला. मुंबईचे एक नामवंत दानशूर नागरिक व मुंबईतील डॉकयार्डचे एक बिल्डर करसेंटजी रुस्तुमजी वाडिया या पारशी गृहस्थाच्या स्मरणार्थ हा दवाखाना बांधण्यात आला. करसेंटजी रुस्तुमजी वाडिया यांनी २५ हजार रुपये सरकारी रोख्यात गुंतवून ती रक्कम सरकारच्या स्वाधीन केली. ४ एप्रिल १८६५ पासून हा दवाखाना सुरू झाला.
त्या काळात कॉलरा आणि प्लेगची साथ भयंकर थैमान घालीत असे, अनेक माणसे या साथीत मृत्युमुखी पडत. त्या वेळी ब्रह्मांडजवळचा ‘धर्माचा पाडा’ हे आख्खे गाव उठून दुसरीकडे गेले. ठाण्यातील काही वाडे, चाळी ओस पडल्या. प्लेगच्या साथीचा लोकांनी इतका धसका घेतला की आज प्लेग नामशेष झाला असला तरी कॅसल मिलच्या नाल्याजवळ असलेली प्लेग चाळ त्याची स्मृती आजही जागवत उभी आहे. १८९६-९७ मध्ये ठाणे शहराला प्लेग व कॉलऱ्याच्या साथीने ग्रासले. ही साथ निवारण्यासाठी नागरिकांनीही सहभाग उचलला. डॉ. एफ. ए. मूस व इतर डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्य रक्षणाची काळजी घेत उल्लेखनीय कामगिरी केलीे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून गडकरी रंगायतनसमोरील रस्ता डॉ. मूस रोड म्हणून ओळखला जातो. इंग्रज सरकारने नागरिकांच्या आरोग्याबरोबरच मानसिक आजाराच्या (मनोरुग्ण) रुग्णांसाठी मुंबईच्या सरहद्दीवर पंधरा एकर जमिनीवर चार लाख रुपये खर्चून रुग्णालय बांधले. ही जमीन आणि रोख सुमारे एक लाख १५ हजार रुपये पुतळीबाई यांनी आपले पती सेट नरोत्तमदास माधवदास यांच्या स्मरणार्थ देणगीदाखल दिले. त्यावरून त्यांचे नाव या रुग्णालयाला देण्यात आले. पुढे १९२२ पासून ल्यूनॅटिक असालयमचे मेंटल हॉस्पिटल (मनोरुग्णालय) असे नामकरण करण्यात आले.
ठाणे आणि मुंबईच्या जडणघडणीत विठ्ठल सायन्ना आणि त्यांचे पुत्र नारायण विठ्ठल सायन्ना यांनी मोलाची भर घातली आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ठाण्यातील सरकारी हॉस्पिटलची पुनर्बाधणी १९३६ मध्ये करून गरीब व गरजू रुग्णांसाठी कायमस्वरूपी सोय करून ठेवली.
खासगी रुग्णालये वाढली.
१९६०-७०च्या दशकात वागळे इस्टेटसह अनेक औद्योगिक वसाहती ठाण्यात आल्या. या कंपन्यात नोकरीसाठी कुशल-निमकुशल कामगारांचे लोंढे ठाण्यात येऊन स्थिरावू लागले. निवाऱ्यासाठी वाट्टेल तिथे झोपडपट्टय़ा उभ्या राहू लागल्या. नागरी असुविधांबरोबरच आरोग्याचे प्रश्नही निर्माण होऊ लागले. त्यांच्यासाठी वागळे इस्टेट येथे कामगार रुग्णालय बांधण्यात आले. ठाण्यातील लोकसंख्या जसजशी वाढू लागली, तसतशी दवाखान्यांची कमतरताही जाणवू लागली. ५० वर्षांपूर्वी ठाण्यात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढीच खासगी रुग्णालयांची संख्या होती. डॉ. कारखानीसांचा दवाखाना, डॉ. हजरनिसांचा दवाखाना, डॉ. नरखेल यांचा दवाखाना, डॉ. भागवत यांचा दवाखाना, डॉ. पाणंदीकर यांचा दवाखाना, डॉ. मालतीबाई प्रसूती हॉस्पिटल, धोबी आळीतील डॉ. घोरपडे यांचे प्रसूतीगृह आदींचा त्यात समावेश होता. डॉक्टर-रुग्णांमध्ये जिव्हाळ्याचे नाते होते. फॅमिली डॉक्टरांना समाजात विशेष स्थान होते.
अत्याधुनिक वैद्यकीय सेवा
कामगार विमा योजनेंतर्गत कामगारांच्या सुरक्षेसाठी अनेक कंपन्यांमध्ये रुग्णालये स्थापन करण्यात आली. त्यात रेमंड वूलन मिलचे सुलोचना सिंघानिया रुग्णालय हे ठाण्यातील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवांबद्दल प्रसिद्ध होते. ठाण्याचे महानगरात रूपांतर झाल्यावर ठाणे महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (कळवा हॉस्पिटल) बांधले. मात्र आता लोकसंख्येच्या प्रमाणात ही सरकारी रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत. मात्र त्याच वेळी खासगी वैद्यकीय सेवा क्षेत्रात मात्र लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. आजच्या घडीला प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या दवाखान्यांची संख्या दीड हजाराच्या आसपास आहे, तर मोठय़ा रुग्णालयांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. यामध्ये मोठमोठय़ा गृहसंकुलांच्या आसपास उभी राहणारी श्रीमंतांची गरज भागविणारी लोक हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, कौशल्य फाऊंडेशनचे हॉस्पिटल, बेथानी हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झालेली रुग्णालये उभी राहिली आहेत. तिथल्या उपचारांसाठी आरोग्य विमा योजनाही आहेत. मात्र गरिबांसाठी ही सेवा परवडणारी नाही, हे कटू सत्य आहे.
दरी कमी करा!
शासकीय व सेवाभावी रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या तरी या आघाडीवर नियोजनाचा अभाव आहे. महाराष्ट्र शासनाचा आरोग्यावरील सरकारी खर्च एकूण उत्पादनाच्या एक टक्का होता, तो आता अर्धा टक्क्यावर आला आहे. या आर्थिक चणचणीवर मात करण्यासाठी प्रशासकांनी रुग्णालयात आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करायला सुरुवात केली. हे शुल्कही तळागाळातील गरिबांना न परवडणारे असल्यामुळे गरीब माणूस एक तर शक्यतो आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दुखणे बळावून त्यांना जीवही गमवावा लागतो. असे होऊ नये म्हणून खासगी रुग्णालये व शासकीय रुग्णालये यातील दरी कमी होणे आवश्यक आहे, तरच नि:स्पृहतेने आपली जमीन व रोख देणगी देणारी पुतळीबाई, वडिलांच्या स्मरणार्थ सिव्हिल हॉस्पिटल बांधून लोकार्पण करणारे नारायण विठ्ठल सायन्ना व वाडिया हॉस्पिटलचे प्रणेते दानशूर करसेंटजी रुस्तुमजी वाडिया यांच्या दातृत्वाचा आपण मान राखला असे म्हणता येईल.
सदाशिव टेटविलकर