पाच हजार संशयित आढळल्याने उपचार सुरू

ठाणे : जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून ६३८ पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत १९ लाख ९२ हजार ६५३ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये करोना, सारी आणि इन्फ्ल्युएन्झा यांसारख्या आजारांची लक्षणे असलेले ५ हजार ६९० संशयित आढळून आले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागात दररोज आढळणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठाणे जिल्ह्य़ाच्या अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या पाच ग्रामीण तालुक्यांमध्येही करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरल्याचे पाहायला मिळत होते. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये ग्रामीण भागांत दररोज १५० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारतर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेतर्फेही या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ६३८ पथके तयार केली. या पथकांच्या माध्यमातून पाच तालुक्यांतील ५ लाख ९३ हजार ५६३ कुटुंबांतील १९ लाख ९२ हजार ६५३ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले. या सर्वेक्षणात शरीराचे तापमान, ऑक्सिजनची पातळी आणि नाडी परीक्षण करण्यात आले असून त्यामध्ये करोना, सारी आणि इन्फ्ल्युएन्झा यांसारख्या आजारांची लक्षणे असलेल्या ५ हजार ६९० संशयितांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

ग्रामीण भागांत करोना आटोक्यात

जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागांत सात महिन्यांपासून एकूण १६ हजार ८७८ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. मात्र जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण भागासाठी आरोग्यव्यवस्था उभारल्यामुळे आतापर्यंत १४ हजार ६६९ नागरिक करोनामुक्त झाले आहेत, तर सध्या केवळ १ हजार ६७९ नागरिक विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. १५ दिवसांपूर्वी १५० हून अधिक रुग्ण आढळणाऱ्या ग्रामीणमध्ये सध्या दररोज ७० हूनही कमी रुग्ण आढळून येत आहेत.