एक हजार खाटा शिल्लक असल्याचा प्रशासनाचा दावा; तरीही रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी

ठाणे : करोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना अत्यवस्थ आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचे खाटा मिळवताना अक्षरश: हाल सुरू आहेत. रेमडेसिविर लशीसाठी करावी लागणारी वणवण तसेच प्राणवायूच्या तुटवड्यामुळे बंद असलेल्या सुसज्ज रुग्णालयांमुळे ठाणे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण वाढला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एक हजार ९८ म्हणजे २४ टक्के खाटा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र एक साधी खाट मिळवतानाही रुग्ण आणि नातेवाईकांना घाम फुटत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात २४ टक्के खाटा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात महापालिकेच्या करोना वॉररूममधून रुग्ण आणि नातेवाईकांना खाटा शिल्लक नसल्याचे निरोप मिळत आहेत. बऱ्याचदा वॉररूमचे फोनही उचलले जात नसल्याचा अनुभव रुग्णांच्या नातेवाईकांना येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दररोज सरासरी १३०० ते १५०० नव्या रुग्णांची भर पडत आहे. शहरात सद्यस्थितीत १६ हजार ४४५ रुग्णांपैकी १२ हजार ४०२ रुग्ण घरी तर ३ हजार ५६८ रुग्ण पालिका तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात पालिका तसेच खासगी अशी एकूण ४१ करोना रुग्णालये असून त्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी एकूण ४ हजार ६६६ खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी ३ हजार ५६८ खाटांवर रुग्ण उपचार घेत असल्यामुळे सद्यस्थितीत १ हजार ९८ म्हणजेच २४ टक्के खाटा शिल्लक असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. १ हजार ९८ खाटांपैकी ३५६ साध्या खाटा, ४८६ प्राणवायू खाटा, २५६ अतिदक्षता विभागातील खाटा आणि २०२ व्हेंटिलेटरच्या खाटांचा समावेश आहे, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना वेगळाच अनुभव येत आहे. चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतरही बरेच तास उलटून वॉररूममधून रुग्णांना संदेश किंवा फोन येत नाही. त्यामुळे वॉररूमशी संपर्क साधला असता योग्य प्रतिसात मिळत नसल्याचा  अनुभव रुग्णांना  येत आहे.

घरीच प्राणवायू सिलिंडरची व्यवस्था

ठाणे येथील पवारनगर भागातील एका महिलेचा करोना सकारात्मक अहवाल १३ एप्रिलला आला. तेव्हापासून त्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांकडे प्रयत्न करीत होत्या. दोन दिवस उलटूनही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्याचदरम्यान त्यांची प्रकृती खालावली. अखेर तिच्या पतीने घरीच ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली. तिच्या पतीलाही करोनाची लागण झाल्याचे आता अहवालातून समोर आले. त्यामुळे हे दोघे गुरुवार रात्रीपासून पालिकेच्या वॉररूमशी संपर्क साधून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याकरिता विनंती करीत आहेत. मात्र, नोंदणीच झालेली नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात खाट उपलब्ध करून देता येत नसल्याचे वॉररूमकडून सांगण्यात आले. अखेर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मोबाइल संदेशाद्वारे या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांचे स्वीय साहाय्यक वैभव काळे यांनी फोनद्वारे संबधितांना सूचना दिल्यानंतर खाट उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी शशिकला पुजारी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

नोंदणी प्रक्रियेत गोंधळ

एका व्यक्तीचा करोना अहवाल सकारात्मक  आल्यानंतर त्याची माहिती पालिकेच्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नोंद करावी लागते. ही नोंदणी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णांना वॉररूमशी संपर्क साधावा लागतो. मात्र रुग्ण नोंदणी प्रक्रियेतच बराच गोंधळ असून त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. पालिकेची पथके घरी आल्यामुळे नोंद झाली असेल असा समज करून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक वॉररुमशी संपर्क साधतात. त्यावेळेस त्यांची नोंदणीच झालेली नसल्याचे समोर येते. पालिकेच्या पथकानेच वॉररूमला कळविणे गरजेचे आहे. पण, तसे होताना दिसून येत नाही. या ढिसाळ नियोजनामुळे एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्यास उशीर झाला तर, त्याच्या जीवावर बेतू शकते.