News Flash

आरोग्यवर्धक रानमेवा वसईच्या बाजारात

सफरचंद, संत्री अशा फळावर सुखावणारे ग्राहक आता सध्या रानमेव्याची खरेदी करताना दिसत आहेत.

बाजारातील फळांवर केल्या जाणाऱ्या घातक रासायनिक प्रयोगांमुळे ग्राहक जांभूळ, राजन, करवंद, जाम, ताडगोळे  अशा रानमेव्याला मोठय़ा प्रमाणात पसंती देत आहेत.

वसई : सफरचंद, संत्री, आंबा अशा मोठय़ा फळांबरोबर आपले अस्तित्व टिकवून  ठेवलेला रानमेवा उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत दृष्टीस पडतो. या महिन्यात  जांभूळ, राजन, करवंद, जाम वसईच्या बाजारात दाखल झाली असून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रानमेवा बाजारात दाखल झाल्याने उन्हाच्या काहिलीपासून लोकांना दिलासा देण्यास पूरक ठरते आहे.

हजारो वर्षांपासून चालत आलेली रानमेव्याची परंपरा काळाच्या ओघात बदलत गेली असली तरी आदिवासी समाजात अन्नाचा घटक म्हणून मान्यता असलेल्या रानमेव्याचे महत्त्व कमी झालेले नाही. रानावनात अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्य करून राहिलेला आदिवासी समाज अनेक गोष्टींवर आपली उपजीविका चालवतात. त्यामुळे आदिवासींना हंगामी रोजगाराचे साधन उपलब्ध होते.

उन्हाळ्यात मध, करवंदे, गावठी आंबे, तोरणे, पायरी, पिंपळाची फळे, आवळा, रान फणस, ताडगोळे, भोकर, जाम, जांभळे गोळा करतात आणि बाजारात येऊन विकतात. वर्षांतून एकदाच आस्वाद घ्यायला मिळणारी ही फळे वसईच्या बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांचा रानमेव्याकडे चांगलाच कल दिसून येत आहे.

सफरचंद, संत्री अशा फळावर सुखावणारे ग्राहक आता सध्या रानमेव्याची खरेदी करताना दिसत आहेत. खेडय़ापाडय़ातून आलेल्या महिला टोपल्यातून ही फळे विकायला बसलेल्या बाजारात दिसत आहेत.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाडय़ात ही फळे खूप लाभदायक ठरतात. वेगवेगळय़ा रोगांवर ती गुणकारी मानली जातात. सफरचंद, संत्री, आंबा, टरबूज, डाळिंब, चिकू, केळी या फळांवर मोठय़ा प्रमाणात रासायनिक प्रक्रिया करण्यात येते, त्यामुळे ही फळे आरोग्याला घातक असल्यामुळे रानमेव्याच्या रूपाने आरोग्यवर्धक पर्याय लोकांसाठी उपलब्ध आहे.

आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या या रानमेव्याचा भाग असलेली करवंदे आदिवासी बांधवांना एप्रिल अखेरपासून ते जूनपर्यंत साधारणपणे अडीच महिने रोजगार मिळवून देते.

वसईच्या बाजारात १० रुपये एक वाटा या दराने ही करवंदे, जांभूळ  विकली जातात. एका टोपलीत साधारणपणे ५० ते ६० वाटे असतात. त्यानुसार दिवसभरात ४५० ते ५०० रुपये त्यांना मिळत असल्याचेही रानमेवा विक्रेत्या महिलांनी सांगितले.

पाणीदार ताडगोळे शरीरातील उष्णता कमी करतात. आदिवासी समाज पूर्वापार ताडगोळ्यांचा वापर करत. मात्र अलीकडे किनारपट्टीलगतच्या भंडारी समाजाने यास व्यावसायिक स्वरूप देत आर्थिक विकास साधला आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवून उष्णता कमी करण्यासाठी रानमेवा वरदान ठरत आहे. सध्या डझनभर ताडगोळे ५० ते ७० रुपये किमतीने मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 2:25 am

Web Title: healthy ranmeva in vasai market
Next Stories
1 ग्रामीण भागात पाणीटंचाई, शहरी भागात पाण्याचा अपव्यय
2 दाऊदची माहिती मिळविण्यात पोलीस अपयशी
3 नवऱ्यानेच बायकोवर बलात्कार करुन तिची हत्या केली, पत्नीवर प्रेमसंबंधांचा होता संशय