कल्याण डोंबिवली परिसराचे गावपण शहरीकरणाच्या वेगाने केव्हाच पुसले गेले आहे. वर्षांनुवर्षे सांस्कृतिकतेचे प्रतीक मिरविणाऱ्या या शहरांना गेल्या काही वर्षांत बेकायदा बांधकामे, झोपडय़ांचा विळखा बसला आहे. नियोजनाच्या आघाडीवर फसलेल्या या शहरात सकाळ, सायंकाळच्या वेळेत व्यायाम, शतपावलीसाठी मोकळ्या आणि विकसित जागा असाव्यात, अशी येतील रहिवाशांची सर्वसाधारण अपेक्षा आहे. ठाण्यासारख्या शहरात मोकळ्या पदपथांवर हिरवळ फुलवून खुल्या व्यायामशाळांची साखळी उभी केली जात असताना कल्याण डोंबिवलीत भोपरसारखी एरवी निसर्गरम्य वाटणारी टेकडीही भूमाफियांच्या घशात जाऊ लागली आहे. कल्याण डोंबिवलीकरांची शतपावली चिखलात, अस्वच्छतेच्या गर्तेत सापडू लागली आहे. स्मार्ट शहराची भाषा एकीकडे केली जात असताना साध्या सुविधांच्या पातळीवर येथील रहिवाशांच्या पदरी निराशा येऊ लागली आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील असंख्य रहिवाशी पहाटेपासूनच शतपावलीसाठी घराबाहेर पडतात. ठरावीक रहिवाशांचा तर हा वर्षांनुवर्षांचा दिनक्रम आहे. सकाळच्या वेळेत शहराबाहेरील मोकळ्या हवेत शतपावली आणि व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या रहिवाशांचे जथ्थे पहावयास मिळतात. यात सर्वसामान्यांसोबत डॉक्टर, वकील, व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी अशी विविध क्षेत्रांतील मंडळी असतात. दिनक्रम सुरू होण्यापूर्वी पहाटेच्या वेळेत शहरातील, बाहेरील मोकळ्या जागांवर शतपावली, योगासने, सायकल चालविणे, धावणे असे प्रकार करण्याकडे अनेकांचा कल असतो. शहरातील रहिवासी ज्या उद्यान, गणेशघाट, क्रीडासंकुलसारख्या मोकळ्या हवेच्या ठिकाणी जातात तेथील परिस्थिती मात्र अत्यंत दयनीय अशीच आहे. रहिवाशांना खरच तेथे निसर्गरम्य वातावरणातील स्वच्छ शुद्ध प्राणवायू मिळतो का, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका विकास कामांच्या आघाडीवर सकारात्मक पाउले उचलेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांतील चित्र फारसे सकारात्मक नाही. शहरातील रहिवाशांना सकाळ, सायंकाळी पाय मोकळे करण्यासाठी, व्यायामासाठी मोकळ्या, स्वच्छ जागा मिळू नयेत हे खरे तर येथील रहिवाशांचे दुर्दैव म्हणायला हवे. कल्याणमधील बहुतांशी रहिवासी दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेश घाट येथे शतपावलीसाठी येतात. सकाळी या भागात आल्यानंतर रात्रीच्या वेळेत या भागात बैठका मारून गेलेल्या शौकिनांच्या दारूच्या बाटल्या, चाखण्यासाठी आणलेल्या पिशव्या, कागदांचे ढीग सर्वत्र पडलेले दिसतात. हे सगळे ओलांडून पुढे गेल्यानंतर मोकाट कुत्र्यांच्या विष्ठा, दरुगधी असे त्रासदायक चित्र या ठिकाणी दिसते. दुर्गाडी किल्ल्याजवळ, गणेशघाटाला खेटून असलेल्या आधारवाडी कचरा भूमीवरील कचऱ्याचा दरुगधीमुळे या भागातील रहिवाशी हैराण आहेत. अशीच परिस्थिती डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहाची आहे. शहरातील बहुतांशी वर्ग क्रीडासंकुलातील पायवाट (ट्रॅक), मोकळ्या जागेचा चालणे, धावणे आणि बैठकीसाठी वापर करतात. काही गट बंदिस्त क्रीडा गृहाचा वापर करतात. परंतु, बंदिस्त क्रीडागृहाला चोहोबाजूने गळती लागली आहे. बॅडमिंटन कोर्टची दुर्दशा झाली आहे. पावसाचे पाणी सभागृहात पसरत असल्याने त्यावर तयार झालेले डास रहिवाशांना स्वस्थ बसून देत नाहीत. सभागृहात जागोजागी पाण्याची तळी साचलेली असतात. क्रीडागृहात झाडलोट नसल्याने कबूतरांची विष्ठा, दरुगधी अस्वस्थ करते. विजेचे फलक तुटलेले आहेत. त्यामुळे विजेचा धक्का बसण्याची भीती असते. या बंदिस्त क्रीडागृहाची योग्य देखभाल करून ते कोणाला तरी चालवायला द्या म्हणजे त्याची निगा राखली जाईल. त्याचबरोबर शहरातील तरुणांसह शहरवासीयांना या सुविधेचा पुरेपूर लाभ उठवता येईल, अशी मागणी जेष्ठ शिक्षक व क्रीडाप्रेमी दिवंगत सुरेंद्र वाजपेयी महापालिका प्रशासनाकडे करीत असत. अनेक पदाधिकाऱ्यांसमोर त्यांनी वेळोवेळी हा विषय उपस्थित केला. कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. याउलट क्रीडासंकुलातील व्यायामशाळा, तरणतलाव व अन्य सुविधा कोणत्या नेत्या, पदाधिकाऱ्याच्या ठेकेदाराला चालवायला द्यायच्या या वादात मागील १५ वर्षांत क्रीडासंकुलातील सर्व महत्त्वाच्या सुविधांचे प्रशासनाने तीनतेरा वाजवून ठेवले आहेत. सुरुवातीला एका महापालिका अधिकाऱ्याचा आशीर्वाद असलेला ठेकेदार या सगळ्या सुविधा पाहत होता. ठेकेदार आणि अधिकाऱ्याच्या पखाली भरल्यानंतर या ठेकेदाराने क्रीडासंकुलातील सुविधांची देखभाल करण्याऐवजी तेथून पैसे कमविण्याचे साधन तयार केले. ही चटक मग अन्य अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लागली. या स्पर्धेत शहरवासीय एका चांगल्या सुविधेपासून वंचित झाले. बंदिस्त क्रीडागृहात प्लॅस्टिकची चटई बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण क्रीडागृहाची एकूण दुरवस्था पाहता हा सगळा खर्च पाण्यात जातो की काय, अशी भीती संयोजकांना वाटते. अनेक क्रीडाप्रेमी सकाळच्या वेळेत आहे त्या परिस्थितीला तोंड देत बंदिस्त क्रीडागृहात जमतात. शरीराला थोडासा व्यायाम देऊन निघून जातात. क्रीडासंकुलातील बराचसा भाग नशाप्रेमींचा अड्डा बनला आहे. या भागात गांजा, चरस फुके रात्रभर या भागात तळ ठोकून असतात. दक्ष नागरिकांच्या एका गटाने अशाच एका गटाला पकडून दिले होते.
डोंबिवली पश्चिमेतील ज्या रहिवाशांना पूर्व भागात शतपावलीसाठी जाता येत नाही. अशी मंडळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भागशाळा मैदानात सकाळच्या वेळेत शतपावलीसाठी जातात. या रहिवाशांना घन:श्याम गुप्ते रस्ता, रेणुका रुग्णालय, पंजाब नॅशनल बँक गल्लीतून भागशाळा मैदानाच्या दिशेने येताना कचऱ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली सोसायटीतील रहिवाशांची वाहने, त्याच्या आजूबाजूला फेकण्यात आलेला कचरा. त्यात पदपथावर कचऱ्याची विष्ठा. महापालिका कर्मचाऱ्याने सकाळच्या वेळेत हा कचरा साफ केला. सफाई कामगार निघून गेले की याच भागातील काही रहिवाशी पुन्हा याच रस्त्यावर वाहनांच्या आडोशाने कचरा फेकतात. डोंबिवली गृहनिर्माण संस्थेच्या कोपऱ्यावर अशाच प्रकारे कचरा फेकण्यात येतो. एखाद्या जागरूक रहिवाशाने कचरा फेकणाऱ्या रहिवाशांना हटकले तर त्यास रहिवाशांच्या दादागिरीचा सामना करावा लागतो, असा अनुभव साहित्यप्रेमी सुरेश देशपांडे यांनी सांगितला. मैदानात गेल्यानंतर झाडांच्या आडोशाला रात्रीच्या शौकिनांच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या पडलेल्या असतात. शतपावलीसाठी येणारे नागरिक लाजेखातर ते एका पिशवीत भरतात आणि मैदानातील उपक्रम आटोपले की ती पिशवी कचराकुंडीत नेऊन टाकतात.
डोंबिवली पूर्व भागातील शिवमंदिर रस्त्यावरील पुसाळकर उद्यान रामनगर, दत्तनगर परिसरातील रहिवाशांना मध्यवर्ती ठिकाणी आहे. ५४ लाख खर्च करून या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. घराजवळ उद्यान विकसित झाल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले होते. चालण्याचा जास्त त्रास न घेता उद्यानातील पायवाटेवर फे ऱ्या मारता येतील. सकाळ, संध्याकाळ उद्यानात निवांत बसता येईल, अशी गणिते रहिवाशांनी केली होती. मात्र, एव्हाना रहिवाशांचा भ्रमनिरास झाला आहे. पुसाळकर उद्यानात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रेमीयुगले झाडांच्या आडोशाला येऊन बसतात. त्यांच्या विचकट चाळ्यांमुळे उद्यानात फिरणे अवघड होते. याही उद्यानात रात्रीच्या वेळेत मेजवान्या पार पडतात. तो सगळा कचरा नियमित पडून असतो. उद्यानाच्या एका बाजूला सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाचा सर्वाधिक वापर आजूबाजूच्या झोपडपट्टीमधील रहिवासी करतात. या स्वच्छतागृहाची सगळी दरुगधी उद्यानात पसरते. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत उद्यानात योगासने करण्यासाठी बसल्यानंतर स्वच्छ प्राणवायू दूरच, दरुगधीचा सामना रहिवाशांना करावा लागतो, अशी खंत या भागातील रहिवासी अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. उद्यानाच्या बाजूला कचरा वेचकांचे केंद्र आहे. या कचऱ्याचे प्लॅस्टिक कापडात बांधलेले ढीग हे रहिवाशांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. उद्यान महापालिकेचे असल्याने याठिकाणी एक सुरक्षा रक्षक तैनात करा, ही रहिवाशांची मागणी आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उद्यानाला लाखो रुपये खर्च करून इतिहासकालीन दरवाजे बसविले आहेत, पण त्यांचा काडीचाही उपयोग होत नाही.
भोपर टेकडीला बांधकामांचा विळखा
चालण्यात पटाइत असलेले शहरवासीय भोपर टेकडीवर भ्रमंतीसाठी जातात. तेथे जाताना त्यांना नांदिवली भागात मातीचे चिखलाचे रस्ते पाहण्यास मिळतात. भोपर टेकडीला बांधकामांचा विळखा पडत चालल्याने ही टेकडी फक्त नावाला टेकडी म्हणून ओळखली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डोंबिवली पश्चिमेत रेतीबंदर गणेशघाट भाग हा निसर्गरम्य खाडीकिनारा असलेला भाग आहे. या भागाला बेकायदा चाळींचा विळखा पडला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वस्ती वाढत चालली आहे. त्यामुळे तेथे कचरा, दलदल असे प्रकार निर्माण होत आहेत. बांधकाम साहित्य वाहून नेणारे ट्रक प्रत्येक ठिकाणी येरझऱ्या मारीत असल्याने, रस्त्यांची, पायवाटांची सर्वत्र दैना करण्यात आली आहे. या दलदलीच्या चिखलमय रस्त्यावरून शतपावली करणारे रहिवासी आपली पाऊलवाट शोधत सकाळचा स्वच्छ प्राणवायू शोधण्यासाठी धडपडत आहेत. सकाळ, संध्याकाळ शहरातून वाहतूक कोंडीमुळे चालणे शक्य होत नाही. त्यामुळे रहिवासी मोकळा श्वास घेण्यासाठी शहराबाहेरील मोकळ्या वातावरणात फिरण्याचा प्रयत्न करतात, पण तेथील सगळ्या पाऊलवाटा कचरा, दुर्गंधी आणि चिखलाने मळलेल्या असतात. हे विषय पालिकेच्या अखत्यारीतील असल्याने प्रशासनाने या महत्त्वपूर्ण विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…