X

ठाण्यात अस्वच्छता अभियान

ठाणे शहरात मात्र सोमवारी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून आले.

अवघा देश स्वच्छ होत असताना शहरात कचऱ्याचे ढीग

गांधी जयंतीच्या निमित्ताने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी होत भारतभर सोमवारी स्वच्छता मोहीम राबवली जात असताना ठाणे शहरात मात्र सोमवारी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून आले. जिल्हा रुग्णालय, नौपाडा, टेंभी नाका या भागांसह अनेक भागांत कचरा रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, याकडे पालिका प्रशासनानेही लक्ष न दिल्याने पादचाऱ्यांना या कचऱ्यातूनच वाट काढून मार्गक्रमण करावे लागत होते.

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाला सोमवारी तीन वर्षे पूर्ण झाली; परंतु ठाणे शहरात या अभियानाचा लवलेशही दिसून आला नाही. मासुंदा तलाव, स्टेडिअम रोड, स्टेशन रोड, भाजी मंडई, आंबेडकर रोड आदी शहराच्या मुख्य विभागांमध्ये ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडय़ा, रस्त्यावर सांडलेला पालापाचोळा, कुजलेल्या भाज्यांचे ढीग दिसून येत होते.

नवरात्र उत्सवानिमित्त दर वर्षी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात जत्रा भरते. मात्र नवरात्रोत्सव संपला तरी या परिसरात जागोजागी कचरा पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे तलावातील स्वच्छता करणाऱ्या पालकमंत्र्यांचे या कचऱ्याकडे लक्ष नाही का, असा प्रश्न सामान्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातही अस्वच्छता कायम असून रुग्णालयाच्या विभागातील भिंती नागरिकांच्या थुंकण्याने खराब झाल्या आहेत. रुग्णालयाच्या आवारातच प्लॅस्टिकचे कप, कागदाचे कपटे पसरलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे स्वच्छ भारताचा नारा हा फक्त दिखावा आहे का, असा प्रश्न सामान्य आणि सुशिक्षित नागरिकांना पडत आहे. रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करावे या दृष्टीने तेथील भिंतीवर चित्र रेखाटण्यात आली होती. मात्र त्या सुंदर चित्र असलेल्या भिंतीही नागरिकांकडून खराब करण्यात आल्या आहेत. नौपाडा येथील भगवती शाळेच्या समोर कचराभूमीच तयार झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या शाळेच्या परिसरात अनेक वेळा दुर्गंधी पसरलेली असते. या शाळेच्या परिसरात रात्रीचे गर्दुल्लेही गर्दी करतात. गावदेवी मैदानासमोरही कचऱ्याचा खच पडलेला दिसून येतो. ठाणे शहराच्या महत्त्वाच्या परिसरातच अशा प्रकारे कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत असल्याने शहराच्या अंतर्गत भागाकडे दुर्लक्षच केले जात आहे.

 

 

  • Tags: garbage-in-thane,
  • Outbrain