भातपिकांची उचल ठेव सुरूच; आडोशाला ठेवलेले भारे चिंब

लोकसत्ता वार्ताहर

वसई: अवकाळी पडणाऱ्या पावसाच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने कापून झालेले भात पीक जोपासून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे कापणी झालेल्या भात पिकांची उचल ठेव करण्याचे काम सुरूच आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाने उसंत दिल्याने वसईच्या भागातील शेतकऱ्यांनी भात शेतीची कापणी सुरू केली होती. परंतु पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने तयार झालेले व कापणी झालेले भात पीक पूर्णत: पाण्यात भिजून गेले आहे.  काही ठिकाणी भातकापणी आटोपून बांधलेले भाताचे भारे खळ्यात मोकळ्या जागेत ठेवले होते. मात्र काल अचानक पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने मोकळ्या जागेतील भाताचे भारे भिजले.   वसईतील खानिवडे, राजावळी, कामण, जूचंद्र, पोमण, नागले, मोरी, शिरवली यासह इतर ठिकाणच्या भागात तयार भातपिकाची नासाडी झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

ग्रामीण भागात भात शेती हा शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. दरवर्षी तयार होणारे भात पीक याची कापणी, मळणी, झोडणी करून येणारे भात गोलाकार तयार करण्यात आलेल्या कोठाऱ्यात साठवून ठेवले जाते. परंतु मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी अवकाळी पावसाने भाताची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच मोठा फटका दिला त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

अवकाळीने तयार भातशेताचे पुरते नुकसान झाले आहे. टाळेबंदीमध्ये कामधंदे बंद असताना शेतीचा आधार होता, मात्र आता तोही अवकाळी पावसाने हिरावला, शासनाकडून निदान नुकसानभरपाई मिळावी हीच अपेक्षा, शेतकरी राजेंद्र म्हस्कर, सुरेश घरत यांनी व्यक्त केली आहे.

प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच नुकसान