जनजीवन विस्कळीत, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

ठाणे जिल्ह्य़ात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारी रात्री वाढल्याने शनिवारी अनेक भाग जलमय होऊन तेथील जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्य़ातील जवळजवळ सर्वच नद्यांना पूर आला आहे.

जिल्ह्य़ात शनिवार दुपापर्यंत अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती होती. दिवा, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण भागात पाणी साचल्याने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ठाणे शहरात फारसे पाणी साचले नव्हते; परंतु महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी झाली. ठाण्यात एका इमारतीच्या पत्र्याची शेड चाळीवर पडून दोन जण जखमी झाले, तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले.

ठाणे शहरात खड्डय़ांमुळे कोंडी : ठाणे शहरात शुक्रवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक भागांत पाणी साचले होते. कळव्यातील सह्य़ाद्री सोसायटी, कोपरी रेल्वे स्थानक परिसर, मानपाडा, मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील टोल नाका परिसर या ठिकाणी पाणी साचले होते. घोडबंदर मार्गावरील आनंदनगर आणि पातलीपाडा येथे शुक्रवारी रात्री गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पावसाचा जोर शनिवारी दिवसभर कायम होता; परंतु संततधार नसल्यामुळे जनजीवन सुरळीत होते. पावसामुळे शहरात १२ ठिकाणी वृक्ष उन्मळून कोसळले. शनिवारी पहाटे लोकमान्यनगर भागातील एका इमारतीच्या पत्र्याची शेड चाळीवर पडून दोन जण जखमी झाले. मारुती लोमटे (४१) आणि प्राजक्ता लोमटे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिव्यातील रहिवासी सुरक्षित स्थळी : दिवा पूर्वेकडे खाडीकिनारी वसलेल्या ओमकारनगर भागातील बैठय़ा चाळींच्या परिसरात तीन ते चार फूट पाणी साचले होते. त्यामुळे चाळींतील २०० ते २५० नागरिकांना अग्निशमन दलाने तसेच स्थानिक रहिवाशांनी बोटीच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले. त्याचप्रमाणे गणेशनगर, मुंब्रा कॉलनी, डीजे कॉलनी, सिद्धिविनायकनगर, बी. आर. नगर, नाईक चाळ, नॅशनल हायस्कूल, खर्डी गाव या भागांतही मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. दिव्यातील स्थानक परिसरातील तलाव भरून वाहू लागल्याने त्याचे पाणी आसपासच्या इमारती आणि घरांमध्ये शिरले होते.

बदलापूर, अंबरनाथ पूरग्रस्त  : उल्हास नदीला पूर आल्याने बदलापूर शहरात पाणी शिरले. पश्चिमेकडील रमेशवाडी, हेंद्रापाडा, सूर्योदयनगर, भारत कॉलेज परिसर, बेलवली, मांजर्लीचा नाल्याशेजारचा सखल भाग या ठिकाणी दीड ते दोन फूट पाणी साचले होते. अनेक बैठय़ा घरांत तसेच इमारतींच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरले होते. रेल्वे स्थानक परिसरातील स्थानकाला जोडणारे दोन पूल पाण्याखाली आल्याने स्थानकाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला होता. तर एरंजाड, सोनिवली आणि बदलापूर गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला होता. अंबरनाथमध्येही शुक्रवारी मध्यरात्री शास्त्री विद्यालय ते अंबरनाथ पोलीस ठाणे हा कल्याण-बदलापूर महामार्गाचा भाग पाण्याखाली गेला होता. तसेच बी केबिन रस्ता, शिव मंदिर परिसर, कानसई, कमलाकर नगर, मोरिवली पाडा भागात इमारतींमध्ये पाणी शिरले होते. उल्हासनगर स्थानकाशेजारचा पूलही पाण्याखाली गेला होता. शहरातील सतरा सेक्शन, सम्राट अशोकनगर, वडवली ओटी सेक्शन, सीएचएम महाविद्यालय रस्ता, शांतीनगर, कॅम्प चार भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. दुसरीकडे कल्याण-अहमदनगर महामार्गावरही पाणी साचल्याने कल्याण ग्रामीण भागातील बहुतांश गावांचा संपर्क तुटला होता.

टिटवाळा-मांडय़ात रस्ते पाण्याखाली : टिटवाळा, मांडा भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. कल्याण-मुरबाड रस्त्यावरील रायता नदीला पूर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रस्ता, उमेशनगर, गुप्ते रस्ता, पूर्व रेल्वे स्थानक परिसर, बाजीप्रभू चौक, राजाजी रस्ता, म्हात्रेनगर, आयरे, डोंबिवली एमआयडीसी भागातील नंदी पॅलेस, विको नाका, मिलापनगर, सुदर्शननगर, आजदे इत्यादी भागांतील रस्ते जलमय झाले होते. पंचायत बावडी येथे एक संरक्षक भिंत पाच वाहनांवर कोसळली. महापालिका आपत्कालीन यंत्रणा, अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान रात्रीपासून ठिकठिकाणी मदतकार्य करीत होते. भवानीनगर, अनुपमनगर रोड, घोलपनगर, शिव अमृतधाम, योगीधाम, विधि कॉम्प्लेक्स तसेच आसपासच्या काही इमारतींमध्ये वालधुनी नदीचे पाणी शिरले होते. मातृछाया, नागेश्वर, आदित्य शिल्प, प्रज्ञा किरण, भीमकृपा, सुदर्शन, जयदुर्गे येथील चाळी आणि इमारतींमधील शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद

उल्हास नदीकिनाऱ्यावरील मोहिली उदंचन केंद्रात पुराचे पाणी शिरल्याने अनर्थ टाळण्यासाठी कल्याण महापालिकेने शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून मोहिलीची पाणीपुरवठा यंत्रणा बंद केली. परिणामी डोंबिवली शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांनी केले आहे.

कल्याण-डोंबिवली जलमय : कल्याणच्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महापालिकेने त्या भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी नाला, खडेगोळवली, जरीमरी नाला आणि इतर सर्व मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. विठ्ठलवाडी स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी इमारतींच्या आवारात पाणी शिरल्याने वाहने पाण्याखाली गेली. डोंबिवलीतील खाडीकिनारी असलेल्या देवीचा पाडा, आंबा माता मंदिर, चौपाटी, अनमोल नगरी,गरिबाचा पाडा, कुंभारखाण पाडा, सोनार पाडा, गोळवली, आडिवली, ढोकळी, निळजे, नांदिवली परिसर, शिळ फाटा रस्ता आणि काटई परिसरात पाणी साचले होते. कल्याण पश्चिमेच्या मोहने, आंबिवली, शहाड, अटाळी, बल्याणी, उंबर्डे हे परिसर जलमय झाले होते. पूर्णिमा चित्रपटगृह, घोलपनगर, शहाड, योगीधाम, बारावे, गांधारे परिसरात खाडीचे पाणी शिरल्याने येथील रहिवाशांना घराबाहेर पडणे शक्य होत नव्हते.