तब्बल १८ तासांनंतर बदलापूर शहरातील पूर ओसरला आहे. मात्र या पुरामुळे शेकडो नागरिकांच्या घरांचे, दुकानांचे आणि वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. हेंद्रेपाडा, मांजर्ली, सर्वोदयनगर, रमेशवाडी भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. कचऱ्यामुळे पाणी साचलेल्या भागात मोठय़ा प्रमाणावर दरुगधी पसरली आहे.

बुधवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दोनच दिवसांत उल्हास नदीला पूर आला होता. त्यामुळे बदलापूर शहरात मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरले होते. उल्हास नदीकाठी असलेल्या रमेशवाडी, दीपाली पार्क, हेंद्रेपाडा परिसरात अनेक इमारतींमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. तर शहरातील मुख्य नाल्याशेजारी असलेल्या सर्वोदयनगर, शनिनगर, दुबे बाग रस्ता, भारत महाविद्यालय परिसरात तळमजला पाण्याखाली गेला होता. यामुळे इमारती आणि बैठय़ा घरांना मोठा फटका बसला.  घरांमध्ये १८ पाणी साचले होते. शनिवारी सायंकाळपर्यंत पुराचे पाणी ओसरले. मात्र वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक घरांतील साहित्य, धान्य भिजले होते.

पुराचा सर्वाधिक फटका दुकानदार आणि व्यापाऱ्यांना बसला. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.यातील अनेकांनी घरातील भिजलेले साहित्य, धान्याची पोती रस्त्यावरच रिती केली. त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर कचरा आणि दरुगधी पसरली होती.

पाण्याच्या टाक्यांमध्ये पुराचे पाणी गेल्याने अनेक वसाहतींमध्ये पिण्याचे पाणीही नव्हते. रविवारी सकाळी वेळेवर कचरा उचलला न गेल्याने  नगरसेवक आणि नागरिक तक्रारी करत होते. याबाबत कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांना विचारले असता, दोन दिवसांपासून सफाई कामगार आणि कर्मचारी पूरपरिस्थितीत काम करत असल्याने रविवारी येण्यास उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आणि सेंट्रल हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य तपासणी सुरू केल्याचेही जाधव यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याचे टँकर, स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य, फवारणी पावडर प्रत्येक प्रभागात दिल्याचे माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली आहे. बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.

वरप, कांबा भागातही मदतकार्य : उल्हास नदीकाठच्या वरप, कांबा, म्हारळ, रायते या गावांनाही पुराचा मोठा फटका बसला. या ठिकाणी पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप काढले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाचा दौरा करत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. याठिकाणी उल्हासनगरातील विविध व्यापारी संघटना, राजकीय पक्षांकडून मदतकार्य सुरू होते. येथेही घराचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठी वसलेल्या आदिवासी  आणि ग्रामस्थांची घरे  पाण्याखाली गेल्याने त्यांचे संसार उघडय़ावर आले आहेत.