21 September 2020

News Flash

वादळी पावसाचा धुमाकूळ

वसईतील रहिवासी भाग जलमय; रस्ते पाण्याखाली, वृक्ष भुईसपाट

वसईतील रहिवासी भाग जलमय; रस्ते पाण्याखाली, वृक्ष भुईसपाट

वसई : वसईत सोमवारी रात्रीपासून रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने मध्यरात्रीपासून जोर धरल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन पहाटेपर्यंत शहराचा बराच भाग जलमय झाला. विविध ठिकाणचे रस्तेही पाण्याखाली गेल्याने पादचारी तथा वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

वसई-विरार शहरात सोमवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू होती. मध्यरात्रीनंतर संततधारेचे रूपांतर मुसळधारेत होऊन पहाटेपर्यंत शहरातील विविध भाग पाण्याखाली गेले. नालासोपारातील तुळिंज रोड, विजय नगर, आचोळे, अग्रवाल नगर, संतोष भुवन, सेंट्रल पार्क इत्यादी भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळच्या वेळी पादचारी गुडघाभर पाण्यातून मार्गक्रमण करताना आढळून येत होते, तर वाहनांचा वेगही मंदावल्याचे दिसत होते. विरार पश्चिमेकडील विवा महाविद्यालयाच्या परिसरातही पाणी साचले. या सर्व भागांत दरवर्षी पाणी तुंबते. मात्र महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, अशी या भागातील रहिवाशांची तक्रार आहे.

वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील माणिकपूर मैदान, माणिकपूरच्या दिशेने जाणारा रस्ता तसेच वसई गाव परिसरातील सागरशेत, देवतलाव इत्यादी भागही जलमय झाला. विशेष म्हणजे पाण्याचा निचरा होण्यासाठी लाखो रुपये खर्चून बांधलेले सागरशेत येथील गटारही पाण्याखाली गेले. या भागात गटारात गाडय़ा जाऊ  नये म्हणून स्थानिक तरुण गुडघाभर पाण्यात उभे राहून वाहनचालकांना मार्गदर्शन करत होते. वसई गाव आणि पश्चिम किनारपट्टीवरील गावांकडचे रस्ते फूटभर पाण्यात बुडाले. बंगली, देवतलाव, मर्सेस, होळी इत्यादी ठिकाणच्या रस्त्यांवरून वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू होता.

रात्रभर कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी वसईत रातोरात विविध परिसर पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वसईकरांना पुन्हा एकदा पावसाचा फटका सहन करावा लागला. तर प्रशासकीय यंत्रणेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला.

विरार पश्चिमेला अनेक भागात पाणी साचले होते. विवा कॉलेज रोड, बोळिंज रोड, डोंगर पाडा हे परिसर पाण्याखाली होते. या परिसरातील ७० हून रहिवासी संकुलांत पाणी शिरले होते. अनेक गृहनिर्माण संकुलांतील पाण्याच्या टाक्यात पावसाचे पाणी गेले होते. या परिसरातील काही इमारतींमध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील अनेक भागांत पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले होते.

मीरा-भाईंदरलाही पावसाचा तडाखा

सोमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसामुळे मीरा-भाईंदर शहरातील अनेक भागांत पाणी साचले. परिणामी वाहतूक सेवा ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील अनेक भागांत नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त झाले. मीरा रोडच्या कृष्ण स्थळ, संघवी नगर हाटकेश, मुंशी कम्पाउंड, विजय नगर भागांत पाणी साचले होते. भाईंदरचा टेम्बा मार्ग, बेकरी गली, बीपी रोड भागांत पाणी साचले होते. मंगळवारी दिवसभरात शहरामध्ये ४० ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. यात मीरा रोड परिसरात एकूण १३ झाडे पडली, तर भाईंदर पूर्व परिसरात १० आणि भाईंदर पश्चिम परिसरात १७ झाडे पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:19 am

Web Title: heavy rain in vasai hit normal life of residents zws 70
Next Stories
1 महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
2 Coronavirus : रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर
3 उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोविड केंद्राला गळती
Just Now!
X