अर्ध्या तासाच्या अंतरासाठी तब्बल तीन तास; कोंडीबद्दल वाहनचालकांची नाराजी

ठाणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान व्हावा यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा ठाणे-बेलापूर रस्ता गेल्या काही काळापासून पाऊस वाढताच तासन्तास कोंडीचा महामार्ग ठरू लागला आहे. बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढताच नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

सायंकाळी सहापासून या मार्गावरील ऐरोली, घणसोली, रबाळे परिसरात पावसाचे पाणी साचू लागताच वाहनांचा वेग मंदावला आणि रांगा थेट टोलनाक्यापर्यंत पोहोचल्या. काही माहीतगार वाहनचालकांनी कोंडी टाळण्यासाठी ऐरोलीतून तळवली गावातील रस्त्याच्या दिशेने वाट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेही वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ऐरोली पुलापासून घणसोली स्थानकापर्यंत एरवी अर्ध्या तासाचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना तीन तासांहून अधिक काळ लागत होता.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांचा भार अधिक वाढला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याशिवाय पुणे, गोव्याच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासीही ऐरोली टोलनाका आणि विटावा जंक्शनवरून याच मार्गाने ये-जा करतात. याशिवाय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील कारखाने, भिवंडीतील गोदामांच्या दिशेने जाणारी काही अवजड वाहनेही ठरावीक वेळेत या मार्गावरून मार्गक्रमण करत असल्याने येथील वाहनांचा भार अपेक्षेपेक्षा अधिक वाढला आहे. हा वाढता भार लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या भागात रबाळे तसेच घणसोली परिसरात उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांची निर्मिती केली आहे. या दोन प्रकल्पांमुळे येथून प्रवास करणे काही प्रमाणात सुसह्य झाले असले तरी पाऊस वाढला की हा मार्ग मोठ्या कोंडीचे कारण ठरतो हे वारंवार दिसू लागले आहे.

बुधवारच्या पावसात वाहनांच्या रांगा

बुधवारी दुपारनंतर ठाणे, नवी मुंबई पट्ट्यात पावसाचा जोर वाढू लागताच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा मोठ्या वाहनकोंडीचा सामना करावा लागला. या मार्गाची उभारणी करत असताना ऐरोली येथील सबवे भागातील तांत्रिक दोष दूर करण्याकडे नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे पाऊस वाढला की या भागात पाणी साचते आणि दोन्ही बाजूंकडची वाहने अनेकदा अडकून पडतात. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात हे प्रकार सातत्याने घडू लागल्याने महापालिकेने ऐरोली सबवेच्या दुरुस्तीचे काम केले. त्यानंतर येथे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी बुधवारच्या पावसात या कामातील दोषही काही प्रमाणात दिसून आले. याशिवाय  रबाळे, घणसोली भागातही रस्त्यावर भरपूर पाणी साचले. या मार्गावर पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून वाढल्या आहेत. त्याकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नसल्यामुळे पाऊस वाढताच रबाळे येथील तलावाकडील परिसर तसेच घणसोलीलगतच्या रस्त्यावर पाणी साचून कोंडी होते. बुधवारच्या पावसातही असाच प्रकार घडल्याने ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा अगदी ऐरोली टोल नाक्यापर्यत पोहोचल्या होत्या.

बुधवारी शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती. शहरात पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचत असल्याने वाहने रस्त्यात अडकून राहिली होती. त्यामुळे वाहतुकीत अडथळा येत होता.

– सुरेश लोखंडे, उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक शाखा.