सखल भाग जलमय, घोडबंदरही तुंबले; भिंत पडून एकाचा मृत्यू

गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप पडत असलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासून मुसळधार कोसळायला सुरुवात केल्याने ठाणे शहरात पुन्हा एकदा पूरसदृश स्थिती निर्माण झाली. शहरातील सखल भाग जलमय झाल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असतानाच, घोडबंदरसारख्या नव्याने विकसित होत असलेल्या परिसरातील गृहसंकुलांतही पाणी साचल्याचे दिसून आले. दरम्यान, पातलीपाडा भागात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

ठाण्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांची वाट तुंबलेल्या रस्त्यांनी अडवली. जोरदार पावसाचा शहरातील वाहूतक मार्गावर देखील परिणाम झालेला दिसून आला. पावसामुळे शहरातील वाहतूक मंद गतीने सुरू होती. मंगळवारी ठाणे शहरात ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पावसाचा जोर आणि त्यातच मुंबईतील अंधेरी येथील पूल दुर्घटना यांमुळे रेल्वेने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नोकरदारांनी मंगळवारी घरीच राहणे पसंत केले.

जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते.  हरिनिवास, नौपाडा, मुलुंड चेकनाका, चेंदणी कोळीवाडा, गावदेवी या भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे चित्र होते. गावदेवी मैदानातून मोठय़ा प्रमाणावर चिखलयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, सोमवारी मध्यरात्री पातलीपाडा भागात पालिकेच्या आरक्षित भूखंडाची संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. या भागातील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५३ जवळ एक मोठी रहिवासी चाळ आहे. या चाळीला लागून असलेल्या पालिकेच्या भूखंडाची ३० फुटी संरक्षक भिंत बाजूच्या घरावर कोसळली. यात प्रकाश वाळवे (३५) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी भारती (२९) या गंभीर जखमी झाल्या.

  • या घटनेत समय जाधव हा दहा वर्षांचा मुलगाही किरकोळ जखमी झाला.
  • भिंत पडल्यामुळे आजूबाजूच्या पाच घरांचे मोठे नुकसान झाले. परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अग्निशमन दलाने आणि महापालिकेतर्फे धोकादायक भिंतीचा भाग हटवण्यात आला.
  • भगवती शाळेच्या परिसरातील निमुळत्या रस्त्यावर एक अवजड वाहन आल्याने या मार्गावरील इतर वाहनांना खोळंबून राहावे लागले.
  • ऐन शाळा महाविद्यालये भरण्याच्या आणि सुटण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने शाळकरी मुलांची आणि पालकांची मोठी धांदल उडाली. शाळेच्या बस गाडय़ांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.
  • काही काळ घंटाळी ते राममारुती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कळव्यामध्ये सकाळी गर्दीच्या वेळेस पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. नौपाडा परिसरात पुलाचे काम सुरू असल्याने हरिनिवास भागात देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सॅटिस पुलावरचे पाणी रस्त्यावर

सॅटिस पुलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सखल भाग असल्यामुळे त्या भागात पावसाचे पाणी साचते. एखादी बस येथून जाताच सखल भागात साचलेले पाणी मोठय़ा प्रवाहाने पुलाखालील पादचाऱ्यांवर आणि वाहनांवर पडत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी पावसाचे प्रमाण वाढताच हे चित्र वारंवार पाहायला मिळत होते. पावसाने काही काळ विश्रांती घेतली तरीही सॅटिस पुलावरून हा जलाभिषेक सातत्याने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू होते.