स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद

मुसळधार पावसामुळे रविवारी घोडबंदर परिसरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचे पडसाद बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले असून, या भागातील नाल्याचे प्रवाह बिल्डरांनी वळविल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप सदस्यांकडून या वेळी करण्यात आला. तसेच ही पूर परिस्थिती नेमकी कशामुळे ओढावली, याचा अहवाल देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

घोडबंदर मार्गाखाली पाण्याचा निचरा करण्यात आलेल्या वाहिन्या अरुंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर या रस्त्याचा ठेका घेतलेल्या आयआरबी कंपनीने महिनाभरात काम पूर्ण केले नाही तर या मार्गावरील अवजड वाहनांसाठी असलेला टोल बंद पाडण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

रविवारी झालेल्या मुसळधार पावसामध्ये ठाण्याची नवी ओळख बनू पाहात असलेल्या घोडबंदर मार्गावरील उच्चभ्रू वसाहतीच्या आवारात पाणी साचले होते. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. याच मुद्दय़ावरून बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तसेच ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली याचा जाब विचारत यासंबंधीचा सविस्तर अहवाल देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. नाल्याचे प्रवाह बिल्डरांनी वळविल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या वेळी केला.

पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी आयआरबीची

घोडबंदर महामार्ग महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असून या रस्त्याचे काम आयआरबी कंपनीने केले आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गाखालून पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी या कंपनीची असून त्यासाठी कंपनीने एक महिन्याच्या आत उपाययोजना करावी, अन्यथा अवजड वाहनांकडून होत असलेली टोल वसुली बंद करावी, असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिला. तसेच यासंबंधीचा ठरावही बैठकीत करण्यात आला. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबत निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सेवा रस्त्यांचीही चाळण..

घोडबंदर भागातील सेवा रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. कापुरबावडी ते पातलीपाडापर्यंतच्या सेवा रस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तर पातलीपाडा ते गायमुखपर्यंतच्या सेवा रस्त्याचे काम चार महिन्यांपूर्वी करण्यात आले. चार वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याखाली मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे, तर चार महिन्यांपूर्वी बांधलेल्या रस्त्याशेजारी स्लॅब कलव्हर्टचे काम करण्यात आले. यामुळे या दोन्ही रस्त्यांवर खड्डे पडल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.