24 September 2020

News Flash

खदानीच्या दलदलीत रुतलेल्या वासराची सुटका

म्हारळमधील तरुणांच्या दोन तासांच्या अथक परिश्रमाला यश

वासराची सुरक्षितरीत्या सुटका करण्यात आली.

|| भगवान मंडलिक

म्हारळमधील तरुणांच्या दोन तासांच्या अथक परिश्रमाला यश

म्हारळ गावाशेजारी एका खदानीतील दलदलीत अडकलेल्या गाईच्या वासराची तरुणांनी दोन तासांच्या अथक  प्रयत्नानंतर सुखरुपरीत्या सुटका केली. कल्याणजवळील म्हारळ गावात सोमवारी संध्याकाळी गाईचे वासरू खदानीतील दलदलीत पडले. मुसळधार पावसामुळे परिसरातील ओहळ आणि नाले दुथडी वाहू लागल्याने या परिसरात कुणी नसल्याने वासरू बराच काळ दलदलीत अडकून पडले होते.

वासरू खड्डय़ात पडल्याचे दिसताच गाईने हंबरडा फोडण्यास सुरुवात केली. मुसळधार पाऊस असल्याने परिसरात कोणीही व्यक्ती नव्हती. रस्ते ओस पडले होते. संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिसरातील रहिवाशांच्या ही गोष्ट लक्षात आली.

एका रहिवाशाने म्हारळचे सामाजिक कार्यकर्ते नीलेश देशमुख यांना संपर्क केला. त्यांनी मित्र बाळा चौधरी, विवेक गंभीरराव, नीलेश पवार, संदेश वाडकर, राजन चव्हाण यांना घेऊन खदान गाठली. खदानीत लांब लाकडी वासे टाकून दोराच्या साहाय्याने वासराला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी ते आणखी गाळात रुतत चालल्याचे दिसले. वासरू सुरक्षित आणि नजरेच्या टप्प्यात राहावे म्हणून वासरावर बॅटऱ्यांचे प्रखर झोत सोडण्यात आले.

तात्काळ बचाव पथकातील तरुणांनी जीव धोक्यात घालून लाकडी वाशांवरून खदानीत उतरून दोराचा पेच वासराला गुंडाळून त्याला अलगद खदानीच्या बाहेर काढले. अथक प्रयत्नानंतर मुक्या जिवाला जीवदान मिळाल्याचे समाधान व्यक्त करीत बचाव पथकातील तरुण मंडळी घराकडे परतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 2:07 am

Web Title: heavy rainfall in thane 3
Next Stories
1 वसईत गरोदर महिलेला होडीने रूग्णालयात पोहचवले
2 ठाणे – भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला तडे
3 कोंडीच कोंडी चोहीकडे!
Just Now!
X