जिल्ह्य़ाला शनिवारी पावसाने झोडपून काढले. शुक्रवार रात्रीपासून वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पावसाचा जोर शनिवारी दुपापर्यंत कायम होता. दिवा, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे घोडबंदर मार्गासह या परिसरातील गृहसंकुलांत पाणी साचल्याने त्याचा फटका येथील रहिवाशांना बसला.

आठवडय़ाभरापूर्वी अनेक नद्यांना पूर आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्य़ाचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशीच काहीशी परिस्थिती शनिवारी पाहायला मिळाली. जिल्ह्य़ात शनिवारी सरासरी ८९० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर ठाणे शहरात गेल्या चोवीस तासांत सरासरी २०८.१८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

कल्याण भागालाही फटका

कल्याण, डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक भागातील परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने प्रवाशांना वाट शोधत जावे लागत होते. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील डॉ. रॉथ रस्ता, पाटकर रस्ता, डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथे पाणी शिरले होते. तर, कल्याण जिल्हा न्यायालयाच्या आवारात दोन फूट पाणी तुंबले होते. कल्याण रेल्वे स्थानकातील एक ते तीन फलाटांवर पाणी तुंबल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबई, कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या उपनगरी गाडय़ा उशिराने धावत होती. रायता नदी परिसरात पूर आल्याने कांबा, म्हारळ, वरप परिसरातील सखल भागांत पाणी साचले होते. वाहन चालकांना टिटवाळा, अंबरनाथमार्गे जाण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

उल्हासनगरमध्ये सखल भागांत पाणी

उल्हासनगरातील गोल मैदान परिसर, चोपडा कोर्ट सी ब्लॉक, शहाड स्थानक परिसर, धोबी घाट, खेमानी, फोरवर लाइन, सीएचएम महाविद्यलय रस्ता, शांतीनगर, कैलास कॉलनी या भागांत पाणी साचले होते. पावसामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होते की काय अशी भीती नागरिकांना होती. मात्र शनिवारी दुपारी  पावसाने विश्रांती घेतल्याने शहरात कुठेही पाणी साचण्याचे प्रकार समोर आले नाहीत. संततधार पावसामुळे बारवी धरणाच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून नव्या क्षमतेनुसार धरण भरण्यास अवघ्या दीड मीटरची उंची गाठणे आवश्यक असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे देण्यात आली आहे,

भातसा धरणाचे दरवाजे उघडले

जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी, आंध्रा आणि भातसा धरणावर पावसाची चांगली कृपादृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. बारवी आणि आंध्रा धरण १०० टक्के भरले आहे. तर, भातसा धरण ९१. ४७ टक्के भरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.  भातसा धरणाचे पाच दरवाजे २.५० मीटर उघडले असून सुमारे ९३४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग प्रवाहित केला जात आहे.   भातसा नदीच्या काठावरील शहापूर- मुरबाड येथील सापगाव पूल, सापगाव आणि नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.

नागरिकांना बोटीतून हलविले

वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी आणि राबोडी परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीरंग सोसायटी, वृंदावन आणि राबोडीमधील अनेक गृहसंकुलांमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी साचून मोठे नुकसान झाले महापालिकेच्या दोन बोटींद्वारे नागरिकांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात येत होते. ऋतू पार्क येथील नाला दुथडी भरून वाहत असल्यामुळे ऋतू पार्क गृहसंकुलात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते.

पालघरमध्ये अनेक पूल पाण्याखाली

  • पालघर जिल्ह्य़ात शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्ह्य़ातील वैतरणा, सूर्या व पिंजाळ या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून सूर्या नदीवरील धामणी धरणाचे पाच दरवाजे एक मीटर उघडले आहेत, तर कवडास धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून वैतरणा व पिंजार नद्यांच्या पात्रांनी सतर्कतेची पातळी गाठली आहे.
  • सूर्या नदीवरील कासा-वरोतीदरम्यानच्या पुलावरून अंदाज चुकल्याने पाच गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. पालघर जिल्ह्य़ात सरासरी १५७ मिलिमीटर नोंद झाली. पालघर तालुक्यात २३८ मि.मी., जव्हार १८४ मि.मी., डहाणू १७८, तलासरी १४०, वाडा आणि वसई येथे प्रत्येकी १३१, तर विक्रमगड येथे १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.