ग्रामपंचायत प्रशासनासह विविध संस्था नागरिकांच्या मदतीला

वसई-विरारमध्ये शनिवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सर्वच भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घराघरात पाणी शिरल्याने बचाव आणि मदतकार्यासाठी पालिका प्रशासन, ग्रामपंचायत यांच्यासह विविध संस्था नागरिकांच्या मदतीसाठी धावून आल्याचे दिसले.

मुसळधार पावसामुळे विरार येथील बोळींज, रानपाडा, आगाशी, चाळपेठ, बोळींज चर्च, खारोडी, तोरभाट ते खिवणी, रुमाव आळी ते बावखाल या सर्वच भागांत पाणी साचले होते. या भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पाणी साचल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले. या वेळी रहिवाशांच्या मदतीसाठी लायन्स क्लब ऑफ आगाशी आणि लिओ क्लब ऑफ आगाशी या संस्थांच्या सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांचे सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यात मदत केली तर घरातील फर्निचर उंचावर ठेवण्यास सहकार्य केले. या संस्थांकडून जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली असल्याचे लायन्स क्लब अध्यक्ष नितीन पुरकर यांनी सांगितले, तर दुसरीकडे सत्पाळा हद्दीतील आदिवासी एकता पाडा पाण्याखाली गेला आहे. सतपाल ग्रामपंचायतीने येथील रहिवाशांना सेंट जोसेफ महाविद्यालयात हलविले असून त्यांची राहण्याची सोय केली आहे. रहिवाशांच्या दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत त्यांची जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले.

अर्नाळा येथील पाच बंगला, फॅक्टरी पाडा, शंकर पाडा आणि खाडी पाडा या सर्वच भागांत घरात पाणी शिरले आहे. ग्रामपंचायतीकडून २०० ग्रामस्थांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. एकूण ५०० ते ५५० ग्रामस्थांना येथील शाळेत हलविण्यात आले असून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायत उपसरपंच महेंद्र पाटील यांनी सांगितले.