वसई-विरारमधील विविध भाग जलमय झाल्याने रहिवासी घरातच बंदिस्त

मागील तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे वसईकरांवर घरातच अडकून राहण्याची वेळ आली आहे. शहरात विविध ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून दुकाने बंद आहेत. दूध, भाज्या अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध होत नसल्याने लोकांचे हाल झाले.

शनिवारपासून वसईत अभूतपूर्व मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गल्लीपासून मुख्य रस्त्यांवर पाणी साचले आहे. रस्त्यावरील वाहतूक कोलमडली असून लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी कामासाठी घराबाहेर पडणे टाळले. मुख्य रस्त्यापासून बाजारापेठेत पाणी साचल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

वसई, नालासोपारा, विरार आदी विविध भागात हीच परिस्थिती दिसून येत होती. दुकाने बंद, वीजपुरवठा खंडित झाल्याने खाद्यपदार्थाची खरेदी कुठून करायची असा प्रश्न वसई पश्चिमेच्या विशालनगर येथील रहिवाशांनी उपस्थित केला. अशीच परिस्थिती राहिली तर बुधवारचा दिवस कसा काढायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे, अशी प्रतिक्रिया येथील महिलांनी दिली.

वीजपुरठा खंडित, दुकाने बंद

सोमवार मध्यरात्रीपासून शहरात काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांना अंधारात राहावे लागले. पाणी साचल्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते. दूध, भाज्या अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू देखील शहरातील लोकांना मिळेनाशा झाल्या. औषधांची दुकाने देखील बंद होती. जनजीवन ठप्प झाल्याचे दिसून आले.