26 September 2020

News Flash

वीजपुरवठा खंडित

वीज केंद्राच्या नियंत्रण कक्षात पाणी

वीज केंद्राच्या नियंत्रण कक्षात पाणी

वसई-विरार शहराला वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषण अतिउच्चदाब केंद्राच्या नियंत्रण कक्षात पाणी गेल्याने अनियमित काळासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ७.३० पासून वीजपुरवठा खंडित केला असून जोपर्यंत पाणी ओसरत नाही, तोपर्यंत वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नाही, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. जर रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर वसईकरांना मंगळवारची रात्र अंधारात काढावी लागणार आहे.

सोमवारपासून मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे, वसई-विरार भागाला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्च दाब केंद्राच्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून तसेच उपकरणाच्या सुरक्षेच्या हेतूने वीजपुरवठा मंगळवार सकाळी ७.३०पासून बंद ठेवण्यात आल्याचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी सांगितले. यामुळे वसई गाव, वसई पश्चिम, नालासोपारा पूर्व-पश्चिम, आचोळे, विरार पश्चिम, जुचंद्र, नवघर पूर्व, वालिव, आगाशी, मनवेलपाडा, अर्नाळा या भागांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, तसेच यातील काही भागांचा वीजपुरवठा अप्रिय घटना टाळण्यासाठी, सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला असून परिस्थिती पूर्वपदावर येताच सुरक्षेचा आढावा घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

वीजपुरवठा खंडित झाल्याने वसई-विरारमधील सर्वच नागरिकांचे मोठय़ा प्रमाणावर हाल झाले. पाऊस मुसळधार असल्याने घराच्या बाहेर जाता येत नव्हते तर दुसरीकडे घरात वीज नसल्याने             कोणत्याही प्रकारच्या विजेच्या सोयीसुविधा वापरता येत नव्हत्या. वीज गेल्याने अनेकांची कामे रखडली. मोबाइल, संगणक बंद झाल्याने काम करणे अवघड होऊन बसले होते. पर्यायी असणारा इन्व्हर्टरचा पुरवठाही संपला त्यामुळे नागरिकांची विजेविना दैना उडाली. पाऊस असल्याने घराच्या बाहेर पडत येत नव्हते तर फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेला भाजीपाला विजेअभावी खराब झाला. त्यामुळे नागरिकांच्या जेवणाचेही हाल झाल्याचे वसईतील यश कोथमिरे यांनी सांगितले. अर्नाळा येथे सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस वीज नसल्याने नागरिकांचे हाल झाले. मीरा-भाईंदरमध्ये अनेक भागांमध्ये इमारतींच्या तळमजल्यावर पाणी शिरल्याने वीजकंपनीने तेथील वीजपुरवठा बंद केला. भाईंदर पश्चिम येथील देवचंद नगर, चांदमल नगर, बेकरी गल्ली, गीता नगर, विनायक नगर, उत्तन येथील कराई पाडा, मीरा रोड येथील रामचंद्र नगर, प्लेजंट पार्क या परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 2:18 am

Web Title: heavy rainfall in vasai virar 3
Next Stories
1 मदतीसाठी अनेक हात पुढे
2 पावसाने ‘बंदीवास’
3 साकेत खाडी पुलाला तडे
Just Now!
X