नैसर्गिक नाले बुजलेले, बेसुमार बेकायदा बांधकामे, प्रशासनाचे दुर्लक्ष यांमुळे जलसंकट

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरावर जलसंकट ओढावले. ज्या ठिकाणी आधी कधीही पाणी साचत नव्हते, त्या ठिकाणीही यंदा पावसाचे पाणी साचले. नियोजनाशिवाय झालेली बेसुमार बांधकामे, जागोजागी उभी राहिलेली शेकडो अनधिकृत बांधकामे, बेकायदा पद्धतीने केले जाणारे मातीभराव, पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद करणे यांमुळे हे संकट ओढावले आहे. वसईवर जलसंकट येणार असल्याचा धोका पर्यावरणतज्ज्ञांनी दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक, भूमाफिया, राजकीय नेते यांच्यापुढे ‘लोटांगण’ घालत महापालिका प्रशासनही याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

शनिवारपासून वसई-विरार शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी कधी नव्हे ते पहिल्यांदा पाणी साचले आहे. वसई पश्चिमेकडील अनेक गावे, पाडे, वसाहती पाण्याखाली गेल्या आहेत. रेल्वे स्थानक परिसर, शहरी भागात कंबरेएवढे पाणी साचले आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली गेला आहे. शहरातील या जलसंकटामुळे एकच हाहाकार उडाला असून पालिकेची आपत्कालीन व्यवस्था कोलमडल्याचे दिसून येत आहे. भरती ओसरली तरी पाणी जाण्याचे चिन्ह दिसत नाही. वसईवर जलसंकट येणार असल्याचे पर्यावरणवादी गेल्या काही वर्षांपासून सांगत होते. त्याची प्रचिती आता येऊ लागली आहे.

बेकायदा बांधकामांमुळे नालासोपारा पाण्यात

पाऊस पडला की नालासोपारा पूर्वेचा भाग पाण्याखाली जातो. आचोळे, संतोष भुवन, नगीनदासपाडा, तुळिंज हा भाग जलमय होतो. शहराचा आकार बशीसारखा आहे. तिन्ही बाजूने डोंगर आहे. त्यामुळे पाऊस पडला की पाणी शहरात जमा होते. मात्र सर्वाधिक अनधिकृत बांधकामे या भागात होऊ  लागली आहेत. त्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. नालासोपारा पूर्वेच्या सखल भागासह संपूर्ण मुख्य शहर पाण्याखाली गेले आहे. पालिकेने गेल्या दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. हजारो अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहेत. मात्र आजही त्याच प्रमाणात बांधकामे होत आहेत. वसई पूर्वेच्या राजावली-भोयदापाडा येथे भूमाफियांनी शेकडो एकर वनजमिनींवर अतिक्रमण करून बेकायदा चाळी उभारल्या आहेत. सर्रास नैसर्गिक नाले आणि खाडय़ा बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद होऊन पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

वसईच्या पश्चिमेकडील नाले बुजवले

भुईगाव, नाळे, पापडी, सगरशेत, वालीव, वाळुंजेपासून नानभाट चर्च, वाळूनजा ते शिडी गावापर्यंत तसेच बोळिंज चर्च, खारोडी, तोरभाट ते खिवणी, रुमाव आळी ते बावखाल, दोन तलाव मुख्य रस्ता, कोफराड, जे. पी. नगर आदी भाग पाण्याखाली गेला आहे. गावात यापूर्वी कधी पाणी येत नव्हते. ते आता आल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. बोळिंज येथे शापूरजी पालनजी कंपनीचा गृहप्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाने मातीभराव करून नैसर्गिक पाण्याचे नाले बंद केल्याने  जलसंकट ओढावले आहे, हे गेल्या वर्षांपासून सांगत आहोत, असे वसई पर्यावरण संवर्धक समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी सांगितले.

महामार्गावर भराव

वसई पूर्वेला मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक आठ आहे. येथे गेल्या काही वर्षांपासून पाणी साचू लागले आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूस भूमाफिया, हॉटेल व्यावसायिकांनी भराव केला आहे. भराव करताना पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद केले जात आहेत. त्यामुळे महामार्ग पाण्याखाली जाऊ  लागला आहे.

शहर वाचवण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा देत आहोत. मात्र भूमाफिया, स्थानिकांच्या बेजबाबदारीमुळे वसईवर संकट ओढावले आहे. स्थानिकांनी आपापल्या जमिनी विकासकांना पैशाच्या लोभापायी विकल्या आणि पायावर धोंडा मारून घेतला.शापूरजी पालनजी प्रकल्पामुळे अनेक गावे पाण्याखाली जात आहेत.     – मार्कुस डाबरे, हरित वसई संरक्षण समिती

वसई-विरार परिसरात खार जमिनी आहेत. त्या मोकळ्या होत्या, तेव्हा पाण्याची समस्या नव्हती. परंतु आता या खार जमिनींवर बांधकामे होऊ  लागल्याने पावसाळी पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले.  जे नाले, कालवे अनेक वर्षांपासासून पावसाचे पाणी समुद्रात नेत असे ते अरुंद केले, बुजवले, त्यांचे मार्ग बदलले. – रॉजर रॉड्रिक्स, अध्यक्ष, स्वाभिमानी वसईकर

गेल्या तीन दिवसांत पडलेला पाऊस विक्रमी आहेच, पण शहरातील विविध भागांत झालेली अतिक्रमणे, सखल भागांत विकासकांनी केलेली बांधकामे, नैसर्गिक नाले बुजवणे यांमुळे शहरात पूरसमस्या निर्माण झालेली आहे. रेल्वेने पूर्व आणि पश्चिमेला पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेले नाले अरुंद आहेत. तेही जबाबदार आहेत.   – राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका

महापालिकेने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी चोख नियोजन केलेले होते; परंतु भूमाफिया आणि विकासकांनी अनियंत्रित बांधकामे केलेली आहेत. नाले बुजवून चाळी उभ्या केल्या आहेत. आम्ही सातत्याने अतिक्रमणे तोडत आहोत, अशा विकासकांवर, भूमाफियांवर गुन्हे दाखल करून कारवाई करत आहोत.     – सतीश लोखंडे, आयुक्त, महापालिका