पालिकेकडून विविध उपाययोजना; नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन

स्कायमेट ही हवामान संस्था आणि भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन-तीन दिवसांत होऊ घातलेल्या अतिवृष्टीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी ठाणे महापालिकेने पुरेपूर सज्जता ठेवली आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासोबतच धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करणे, तात्पुरता निवारा, प्रसाधनगृहांची सोय करणे अशा उपाययोजना पालिकेने आखल्या आहेत. याखेरीज पालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे. वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. केवळ सतर्क राहावे, असे आवाहन पालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी केले आहे.

पालिकेच्या उपाययोजना

  • पूरसदृश स्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या सर्व शाळा, खासगी तसेच लग्नसमारंभांची कार्यालये, सभागृहे, समाजमंदिरे नागरिकांच्या निवासासाठी खुली करण्यात येतील.
  • आपत्कालीन परिस्थितीमध्ये चोवीस तास फिरत्या प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणीदेखील फिरते प्रसाधनगृहे ठेवण्यात येणार आहेत.
  • पूरसदृश परिस्थितीत नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोरखंड तसेच बांबू उभारण्यात येणार आहेत.

सखल भागांत बोटी

मुसळधार पावसात जलमय होणाऱ्या परिसरांमध्ये पाणी साचून राहू नये, यासाठी पालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. मासुंदा, हरियाली, अंबे घोसाळे, जेल, रेवाळे, कोलबाड, कौसा, खिडकाळी या तलावांजवळ  शहरातील पूरसदृश परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येकी एक बोट तैनात करण्यात आली आहे.

सखल भाग : वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, घोडबंदर रोड येथील पंचामृत सोसायटी परिसर, विटावा रेल्वे पूल आणि बेलापूर रस्ता, दिवा गाव भाग, ठामपा प्रशासकीय भवन परिसर, डॉ.अल्मेडा रोड, वंदना सिनेमा भाग, राम मारुती मार्ग.

हे करा

कोणतीही दुर्घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाशी त्वरित संपर्क साधा, पाणी उकळून प्या, घरी उपयोगी औषधांचा साठा करून ठेवा.

हे टाळा

गरज नसेल तर अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर पडू नका, पाणी साचलेल्या भागात जाण्याचा प्रयत्न करू नका, वृक्ष तसेच विजेच्या तारांपासून लांब उभे राहा, वाहनांचा वापर टाळा.