News Flash

वादळामुळे दाणादाण

ठाणे जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार सरी;  झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान ठाणे : अरबी समुद्रातून घोंघावत गुजरातच्या दिशेने निघालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्यााला मोठ्या प्रमाणात

सोमवारी दुपारी नौपाडा येथील एक मोठा वृक्ष उन्मळून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनावर कोसळला. त्यात वाहनात बसलेले रितेश गायकवाड हे जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ते झाड कापून रितेश यांची गाडीतून सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले.

ठाणे जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार सरी;  झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान

ठाणे : अरबी समुद्रातून घोंघावत गुजरातच्या दिशेने निघालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्यााला मोठ्या प्रमाणात बसला. सोसाट्याचे वारे आणि मुसळधार सरींमुळे ठाणे शहरासह जिल्ह्याातील सर्वच भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यांमुळे ठिकठिकाणी जवळपास शंभर झाडांची पडझड झाल्याची नोंद झाली, तर पावसाचे पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. याचा फटका प्रामुख्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीवर्गाला बसला, तर करोना निर्बंधांमुळे घरूनच कार्यालयीन कामे करणाऱ्यांची विजेच्या लपंडावामुळे पंचाईत झाली.

गेल्या दोन दिवसांत ठाण्यात १३, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात ४२ आणि कल्याण-डोंबिवली क्षेत्रात २२ वृक्षांची पडझड झाली. या झाडांखाली उभ्या वाहनांचे त्यामुळे नुकसान झाले. शिळफाटा मार्गावरील देसाई नाका येथे एक मोठे होर्डिंग टेम्पोवर कोसळले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाल्याने सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी झाली होती.

ठाणे जिल्ह्यात रविवारी रात्रीपासूनच सोसाट्याचे वारे वाहू लागले होते. पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाणे शहरात झाडे पडून दोन रिक्षा, चार कार, एक दुचाकी आणि तीन घरांच्या छताचे नुकसान झाले. अनेक वृक्ष हे भररस्त्यात कोसळल्याने अंतर्गत मार्गांवरही वाहतूककोंडी झाली होती. करोना निर्बंधांमुळे रस्त्यावरील गर्दी कमी असली तरी, अत्यावश्यक सेवेसाठी कामावर जाणाऱ्या कर्मचारीवर्गाला वादळाचा फटका बसला. पावसाचे पाणी साचून मध्य रेल्वेची उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे रेल्वेस्थानकांमध्ये गर्दी झाली होती. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने घराकडे परतणाऱ्यांना रिक्षा मिळणेही कठीण बनले होते. त्यामुळे ठाणे स्थानकाबाहेरील रिक्षाथांब्यावर प्रवाशांची रांग लागली होती.

रिक्षावर झाड पडल्याने वृद्धाचा मृत्यू

उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प पाच भागात एका उभ्या रिक्षावर एक मोठे झाड कोसळल्याने झालेल्या अपघातात एका ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोमवार दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत आणखी दोघे जखमी झाले आहेत. कॅम्प पाच भागातील निजधाम आश्रमाच्या मागच्या बाजूस गांधी रस्त्यावर एका मोठ्या वृक्षाखाली एक रिक्षा उभी होती. यात तीन जण बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वृक्ष कोसळल्याने या रिक्षाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यात ६२ वर्षीय लखुमल कामदार या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,  तर रिक्षात बसलेले आणखी दोघे जण जखमी झाले असून त्यांना कॅम्प तीन भागातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फलक कोसळून दोघे जखमी

दिवा शहरातही रस्त्यावर पाणी साचले होते, तर भिवंडीमध्येही वृक्ष उन्मळून पडले होते. शिळफाटा मार्गावर देसाई नाका परिसरात एक मोठे होर्डिंग टेम्पोवर कोसळले. या घटनेत सचिन चव्हाण (३५) आणि छबन चौधरी (४५) हे दोघे जखमी झाले.  त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अन्य शहरांतही नुकसान

डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक सहावर उन्नत विजेच्या तारेवर झाड कोसळले. त्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर झाला.

कल्याण, डोंबिवली शहरांच्या बाहेर खाडीकिनारा परिसरांत असलेल्या मोकळ्या जागेतील काही इमारतींवरील पत्र्यांचे निवारे वादळी वाऱ्याने उडून गेल्याचे दृश्य पाहण्यास मिळत आहे.

अंबरनाथ शहरात गेल्या दोन दिवसांत ४२ झाडे उन्मळून पडली आहेत. कानसई, खेर सेक्शन, वडवली, बी केबिन रस्ता, हुतात्मा चौक, स्वामी समर्थ चौक, शिवगंगा नगर, लक्ष्मी नगर या भागात मोठी पडझड पाहायला मिळाली.

बदलापूर शहरातही पूर्व आणि पश्चिम भागांत सात झाडे पडली होती. पडलेली झाडे हटवण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता दोन्ही शहरांचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी व्यक्त केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:35 am

Web Title: heavy rains along winds in thane district akp 94
Next Stories
1 रुग्णसंख्येत घट; मृत्यूंची चिंता
2 संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण केंद्रे बंद
3 विनाकारण फिरणाऱ्या २५० जणांची चाचणी
Just Now!
X