वसईत यंदा झालेल्या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि पावसाने सहा बळी घेतले. पाऊस दरवर्षी पडत असला तरी या वेळचे संकट हे निसर्गनिर्मित नव्हते तर मानवनिर्मित होते. विनाशकारी विकासाच्या नावाखाली, अतिक्रमणाच्या विळख्यामुळे बेकायदा भराव, नैसर्गिक नाले, पाण्याचे मार्ग बंद करणे असे प्रकार सुरू आहेत. त्याचाच हा दुष्परिणाम आहे. ही एक झलक असून भविष्यात याचे अतिभयानक परिणाम वसईकरांना पाहावे लागणार आहे. याचबरोबर प्रशासनाची यंत्रणा किती ढिसाळ आहे त्याचा प्रत्यय निष्पाप नागरिकांचे ज्या प्रकारे बळी गेले ते पाहून येतो.

नुकताच झालेला पाऊस आणि सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी या घटना वसईकरांसाठी धोक्याची घंटा ठरल्या आहेत. कारण आजवर ज्या ठिकाणी पाणी साचले नव्हते, तो परिसर जलमय झाला होता. महामार्ग पाण्याखाली गेला, आदिवासी पाडे बुडाले, वसईच्या पश्चिम पट्टय़ातील विहिरींचे पाणी खारट झाले. ज्या सखल भागात पाणी साचले होते, तेथील पाण्याचा निचरा पाच पाच दिवस होऊ  शकलेला नव्हता. पाऊस तर दरवर्षीच पडतो, मग आताच का ही भयानक परिस्थिती का उद्भवली याच्या मुळाशी शोध घेतला असता हे संकट मानवनिर्मित असल्याचे दिसून येते. त्यातच अशा संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचा दावा करणारी यंत्रणा किती फोल आहे हेही दिसून आले. सप्टेंबरच्या पावसाने सहा बळी घेतले. प्रतिबंधात्मक उपाय सोडा पण साधे गटारांवर झाकणे नव्हते, नाल्याला संरक्षक कठडे नव्हते. त्यात बुडून निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला. वसईतील एक महिला नाल्यात वाहून मरण पावली ते प्रशासनाला कळण्यासाठी पण आठवडा लागला. मानवनिर्मित संकट आणि प्रशासनाची कुचकामी व्यवस्था या साऱ्या गोष्टी गंभीर असून भविष्यात वसईकरांपुढे काय संकट वाढून ठेवले आहे त्याची झलक दाखवतात.

या पावसामुळे वसई जलमय झाली. पाऊस थांबला तरी साचलेल्या पाण्याचा पाच दिवस उलटूनही निचरा झालेला नव्हता. बहुतेक रस्ते पाण्याखाली जाऊन नागरिकांच्या घराघरांत पाणी साचले होते. सर्व आदिवासी पाडे पाण्याखाली गेले होते. नानभाट, बोळिंज आणि नंदाखाल येथील घरातही पाणी साचले होते. नालासोपारा शहराच्या मुख्य भागात पाणी साचले होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गही दोन दिवस पाण्याखाली होता. हेच पाणी साचून वसईत विविध रोगांची साथही पसरली आहे. अतिवृष्टी झाल्याने पाणी साचल्याचे सांगत प्रशासनाने सारवासारव केली आहे, परंतु वसई-विरारमध्ये आजवर जेथे पाणी साचले नव्हते, तेथे प्रथमच पाणी साचू लागले आहे. पाणी जाण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत, तसेच मातीभराव करून इमारती उभ्या करण्यात आलेल्या आहेत. गावागावांमध्ये शिरणारे पाणी हे भविष्यातील महासंकटाची चाहूल देणारे असल्याचे मानले जात आहे. या पावसात कधी नव्हे ते वसईतील आदिवासी पाडे जलमय झाले होते. आदिवासी पाडय़ांना गिळंकृत करण्यासाठी त्याच्या भोवताली बांधकामे केली जात आहे. हजारो टन मातीचा भराव केला जात आहे. वरून शहरात चकाचक टोलेजंग इमारती दिसत असल्या तरी हा विकासाकडे नेणारा विकास असल्याचे वसईतील पर्यावरणवादी सांगतात.

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील नागरिक पूर्वीपासून विहिरींचे पाणी पीत असतात. अतिवृष्टीमुळे गावात पूर आला होता. या पुरामुळे क्षारयुक्त पाणी विहिरीत आणि जमिनीत झिरपले आहे. पश्चिम पट्टय़ातील सत्पाळा, आगाशी, बोळिंज, नंदाखाल आदी गावांमध्ये यापूर्वी कधीच पावसाचे पाणी शिरले नव्हते. यंदा प्रथमच पाणी शिरून विहिरींच्या गोडय़ा पाण्यात मिसळले गेले आहे. या पाण्यातील क्षाराचे प्रमाण (टीडीएस) मोजले असता ते १२०० ते १५०० एवढे झाले आहे. साधारण १०० ते २०० टीडीएस क्षाराचे प्रमाण शरीराला योग्य मानले जाते. परंतु एवढय़ा मोठय़ा प्रमाणात हे क्षाराचे प्रमाण वाढले असल्याने अनेक रोग बळावण्याची शक्यता आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि बेकायदा उपशामुळे यापूर्वीच वसईच्या पश्चिम पट्टय़ातील विहिरींचे पाणी प्रदूषित झालेले होते. आता त्यात खारटणातील पाणी शिरल्याने हे पाणी धोकादायक झालेले आहे.

बेपर्वाई आणि अनास्थेचे बळी

या नैसर्गिक संकटाबरोबरच प्रशासनाच्या बेपर्वा वृत्तीचे संकट कोसळले. अतिवृष्टीने वसईत एकाच रात्रीत सहा जणांचे बळी घेतले. दोन तरुण मोटारसायकलीवरून जाताना थेट पालिकेच्या तलावात बुडाले. तलाव आणि रस्त्याच्या पाण्याची पातळी एक झाली होती. पण तलावाचा गेट उघडा होता. अशा प्रकारे प्रवेशद्वार उघडा ठेवणे धोकादायक आहे एवढे ही काळजी घेता आली नाही. पाऊसच जास्त होता, असे निर्लज्ज उत्तर प्रशासनाने देऊन हात वर केले. पण पालिकेच्या तलावाभोवती संरक्षक उपाययोजना करावी आणि ती न करणे चूक होती हेदेखील मान्य करण्यास तयार नाही.

वसईच्या ओमनगर येथे विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. विजेचे खांब, रोहित्र एवढे धोकादायक अवस्थेत रस्त्यात आहेत की पावसात ते बळी घ्यायलाच टपलेले आहेत. महावितरणावर अशा वेळी गुन्हे का दाखल करू नये? नालासोपारा हे गाव नाही. बकालपण वाढत असले तरी शहर आहे. त्यात नाल्यात दोन जण मोटारसायकलीसकट वाहून जातात ही सुद्धा गंभीर बाब आहे. पावसात नाले भरतात. त्या वेळी वीज गेली होती अंधार होता. अशा धोकादायक ठिकाणी नागरिकांना सावध करणारी काहीच यंत्रणा पालिकेकडे नाही का? किरवली गावात एक वृद्ध महिला नाल्यात वाहून गेली. ती पावसाची बळी होती हे समजायला सुद्धा आठवडा लागला ते देखील तिचे नाल्यातील मृतदेहाचे छायाचित्र दाखवून ती नाल्यात पडल्याचे सिद्ध करावे लागले. पालघर मध्येदेखील नाल्यावरील पूल ओलांडताना तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाला. या पुलाची नुकतीच डागडुजी करण्यात आली होती पण संरक्षक कठडे बांधण्यात आलेले नव्हते. यामुळे मानवी साखळी करून पूल ओलांडत असताना या तरुण मुलाचा बळी गेला. हा असा प्रशासनाचा कारभार. ग्रामपंचायत असो, महापालिका असो वा महावितरण असो. हे सगळेच किती बेफिकीर आणि बेपर्वा असतात, हे या निमित्ताने दिसून आले आहे.

सुहास बिऱ्हाडे @Suhas_News