ठाणे जिल्ह्य़ात पावसाने दमदार हजेरी लावल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले. जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रामध्येही जोरदार पाऊस सुरू असून अद्याप कोणत्याही धरणाने धोक्याची पातळी ओलांडली नाही. गेल्या चौवीस तासांत जिल्ह्य़ामध्ये सरासरी ४९८ मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या आणि वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना वगळता कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नसल्याचेही वृत्त आहे. त्याचप्रमाणे या पावसाच्या पाश्र्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्यात आली होती.
ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात गुरुवारी दुपारपासून पावसाची संततधार सुरू असल्याने शुक्रवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. पावसामुळे ठाणे ते कल्याण या रेल्वे मार्गावर सुमारे एक ते दोन तासांच्या अंतराने लोकलची वाहतूक सुरू होती. मात्र ठाण्याच्या पुढे रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या अनेकांनी अखेर घरची वाट धरली. पण रस्त्यावर रिक्षांची संख्या कमी असल्याने आणि परिवहन उपक्रमाच्या गाडय़ांमध्ये गर्दी वाढल्याने त्यांच्यासाठी हा प्रवास डोकेदुखी ठरला.
ठाणे शहरातील कळवा भागातील वाघोबानगर परिसरामध्ये सुमारे ३० ते ३५ घरांमध्ये गुरुवारी नाल्याचे पाणी शिरल्याची घटना घडली