01 October 2020

News Flash

पावसाची ‘झाडे’झडती

चोवीस तासांत ६४५ मिमी पावसाची नोंद; भिंतींची पडझड, वृक्षसंपदेचे मोठे नुकसान

चोवीस तासांत ६४५ मिमी पावसाची नोंद; भिंतींची पडझड, वृक्षसंपदेचे मोठे नुकसान

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळे विविध शहरांतील वृक्षसंपदेचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या चोवीस तासांत ६४५ मिमी पावसाची नोंद झाली असून पावसासोबत आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्याच्या कचाटय़ात सापडून घरांचे पत्रे उडणे, भिंतींची पडझड, वाहनांचे नुकसान, वीजपुरवठा खंडित होणे अशा अनेक घटना घडल्या.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड या जिल्ह्य़ांतील सर्वच भागांत पावसाचा कहर दिसून आला. ठाणे शहरातील आनंदनगर, बारा बंगला कोपरी, वृंदावन सोसायटी, ओवळा, कावेसार नाका, कापुरबावडी, विटावा रेल्वे पूल, मासुंदा तलाव, नौपाडा, भास्कर कॉलनी, कळवा, हजुरी, तीन हात नाका, कासारवडवली हे १८ परिसर जलमय झाले होते. शहरात २६ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर नऊ ठिकाणी वृक्षाच्या फांद्या तुटून खाली पडल्या. यापैकी पातलीपाडा भागातील महापालिका आयुक्त बंगल्यासमोरील रस्त्यावरील झाड पडून आठ दुचाकींचे नुकसान झाले. वागळे इस्टेटमध्ये एका इमारतीचा सज्जा तर ओवळा परिसरात संरक्षक भिंत कोसळली. उथळसर परिसरात एका इमारतीची लोखंडी शेड कोसळली तर वागळे इस्टेट येथील रुपादेवी

पाडा नं १ परिसरातील एका किरणा दुकानाचे लोखंडी शेड नऊ घरांवर कोसळले. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही.

भिवंडीतही जोरदार पाऊस

गेल्या २४ तासांत भिवंडी शहरात १२४ मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसाने शहराला झोडपले. शहरातील सखल भाग असलेल्या कासार आळी, अंबिकानगर परिसर, मंडई आणि ब्राह्मण आळी या परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. तसेच पावसाचे पाणी बैठय़ा घरांसह दुकानांमध्ये शिरले होते. तर तीनबत्ती भाजी बाजार आणि मच्छी मार्केट या परिसरात पाणी साचल्याने येथील सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील डांबर वाहून गेले. त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर भिवंडी ग्रामीण भागातील दापोडा, मानकोली, राहनाळ आणि काल्हेर या परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने येथील वाहतुकीत अडथळे निर्माण झाले होते.

तालुकानिहाय पाऊस

तालुके                   पाऊस

ठाणे                      १३८.२

भिवंडी                   १२४

कल्याण                ११०.७

उल्हासनगर           १०७.८

अंबरनाथ               ९१.८

मुरबाड                 २४.४

शहापूर                ४८.१

कल्याण डोंबिवलीत ३० झाडे भुईसपाट

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागातील ३० हून अधिक झाडे मुळासकट उन्मळून पडली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कल्याण पश्चिमेतील काही भागात पाणी तुंबून ते परिसरातील घरांमध्ये शिरले. त्यामुळे तेथील रहिवाशांचे हाल झाले. ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर जुने वृक्ष विद्युत वाहिन्यांवर कोसळले. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा दोन तास खंडित झाला होता. कल्याणमध्ये  गटारे, आजुबाजुचे नाले तुंबल्याने चाळींमध्ये पाणी घुसले होते.

अंबरनाथ, बदलापुरात मोठी पडझड

अंबरनाथमध्ये ८ ठिकाणी तर बदलापुरात ७ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली. बदलापुरात रेल्वे रूळाखाली असलेल्या भुयारी मार्गात सायंकाळच्या सुमारास पाणी साचल्याने एक कार अडकली होती. ग्रामीण भागातील वीज पुरवठय़ावर याचा मोठा परिणाम झाला. बदलापुरात आणि ग्रामीण भागात उच्च दाब वाहिनीचे १४ तर लघुदाब वाहिनीचे २६ खांब पडले होते. अंबरनाथ शहरातही पूर्व भागात झाडे पडल्याने रात्री उशिरा खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी दुपापर्यंत पूर्ववत झाला नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 2:15 am

Web Title: heavy rains in thane district caused severe damage to trees in various cities zws 70
Next Stories
1 धरणांत जलभरणा
2 रस्त्यांची चाळण
3 श्रावणातही सामिष आहाराकडे कल
Just Now!
X