दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील रस्त्यांवर खडींचा सडा

ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यानंतर डागडुजी करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पसरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पालिका तसेच अन्य यंत्रणांनी बुजवलेल्या खड्डय़ांतील रेती व खडी बाहेर येऊन सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे महामार्ग आणि उड्डाणपुलांची अवस्था पुन्हा खराब झाली आहे.

ठाण्यात दरवर्षी पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्ग तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडतात. शहरातील या खड्डय़ांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. यावर्षीही तर अधिक वाईट चित्र आहे. मुख्य रस्ते, उड्डाणपूल आणि अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ठाणेकर यांमुळे त्रासून गेले आहेत. खड्डय़ांविषयी नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागताच महापालिका अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडय़ात माजिवडा नाका, नितीन कंपनी, लुईसवाडी, तीन हात नाका, कशीश पार्क येथील खड्डे बुजवले. पालकमंत्री एकनाथ िशदे यांनीही एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीमधील अधिकाऱ्यांना फैलावर घेत महामार्ग आणि उड्डाणपुलावरील रस्त्यांची दुरुस्ती सुरू करून घेतली. पालकमंत्र्यांनी गणेशोत्सवापूर्वी रात्रीचा दौरा काढत काही कामांची पाहणी केली. मात्र दोन दिवसांतच ही तात्पुरती दुरुस्ती उघडय़ावर पडली असून तीन हात नाका, कशीश पार्क, लुईसवाडी, नितीन कंपनी येथील मुख्य रस्ते आणि सेवा रस्त्यांवर पुन्हा खड्डय़ांचे साम्राज्य उभे राहिले आहे. तीन हात नाका येथील सिग्नल परिसर तर संपूर्ण खड्डय़ात गेला आहे. दररोज या मार्गावरून मुंबईहून ठाण्याला आणि ठाण्याहून मुंबई, ठाणे पूर्वेला हजारो वाहनचालक ये-जा करतात. तर, कशीश पार्क येथेही बुजवलेल्या सर्व रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील ज्युपीटर रुग्णालयासमोरील रस्त्यावर, कापूरबावडी उड्डाणपूल आणि नितीन कंपनी येथील उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हा सर्व परिसर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोमवारी ठाण्यात दौरा असल्याने रविवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत रस्त्यांवर उतरून या कामांची पुन्हा पाहणी केली. त्यांचे निवासस्थान असलेल्या भागातील नितीन कंपनी उड्डाणपुलाच्या पायथ्यापासून असलेले खड्डे बुजवून घेतले. हा एकमेव परिसर वगळता इतर ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी

करोनाच्या काळात संपूर्ण यंत्रणा साथ नियंत्रणात व्यग्र असली तरी रस्त्यांवरील खड्डय़ांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ठाण्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात येताना आपल्यालाही खड्डे जाणवले, असे म्हटले. तसेच रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या.