ठाणे शहर खड्डेमुक्त करण्याची घोषणा करत अवघ्या वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांना गेल्या २४ तासांपासून पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे सक्त आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमुक्त झाले होते. मात्र, मोसमातील दुसऱ्या मोठय़ा पावसाच्या माऱ्याने नवे खड्डे अवतरल्याने रस्त्यांच्या निकृष्ट कामावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
गेल्या २४ तासांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर खड्डे दिसू लागले आहेत. साकेत, बाळकूम भागांतही खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून सरस्वती शाळेलगत असलेल्या रस्तेही शरपंजरी पडल्याचे चित्र आहे. वागळे परिसरातील कामगार रुग्णालय परिसर तसेच वर्तकनगर भागातील काही रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. मंगळवारी ठाण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे खड्डय़ांचा अंदाज न आल्याने दुचाक्या पडून अपघात झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते खड्डे विरहित ठेवावेत, असे सक्त आदेश असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. रेल्वे स्थानक परिसर तसेच प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडू नयेत यासाठी पाण्याचा उतार योग्य राहावा यासाठी काही लहान कामेही उरकण्यात आली. मात्र स्थानक परिसरातील खड्डय़ांमधून वाट काढणेही पादचाऱ्यांना कठीण होत आहे.

प्रशासन तत्पर असल्याचा दावा
ठाणे शहरातील काही भागांत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ही वस्तुस्थिती असली तरी ते तातडीने भरावेत, असे सक्त आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली. मुसळधार पाऊस सुरू होताच मंगळवारी रात्री आयुक्तांनी एका तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी सर्व रस्त्यांवरील रस्ते तातडीने बुजवावेत, असे सांगण्यात आले आहे. रेल्वे स्थानक तसेच रहदारीच्या रस्त्यांवर खड्डे असू नयेत यासाठी प्रशासन आग्रही असल्याचा दावाही माळवी यांनी केला.