काही ठिकाणी झाडे उन्मळली, तर घरांचीही पडझड

ठाणे : जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये मंगळवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाचा जोर ठाणे शहरात सर्वाधिक पाहायला मिळाला. पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. या घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिल्ह्याच्या शहरी भागात पावसाचा जोर जास्त असला तरी ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी होते.

ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी सायंकाळपर्यंत कायम होता. ठाणे शहरातील पाचपाखाडी भागातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने दोन चारचाकी गाडय़ांचे नुकसान झाले. तर वसंत विहार, महागिरी कोळीवाडा आणि चिरागनगर भागात झाडे उन्मळून पडल्याने तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. वसंत विहार आणि मुंब्रा आग्निशमन केंद्र येथे झाडय़ाच्या फांद्या उन्मळून पडल्याने चार वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच संपूर्ण शहरात वृक्ष कोसळणे, झाडांच्या फांद्या तुटून पडणे, भिंत कोसळणे अशा २० घटना घडल्या. शहरातील माजिवडा, कोर्ट नाका, जांभळी नाका, शिवाजीनगर, आनंदनगर, ठाणे महापालिका कार्यालयाजवळील परिसर, वंदना सिनेमागृह, कापूरबावडी, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, मुलुंड चेक नाका भागात पाणी साचले होते. तर शहरात मेट्रोची कामे सुरू असलेल्या तीनहात नाका परिसराही पाणी तुंबले होते. भिवंडी, कल्याण-डोंबिवली शहरातही मंगळवारी मुसळधार पाऊसाच्या सरी कोसळल्या. अंबरनाथ, बदलापूर शहरात सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरू होती. या पावसामुळे बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात काही काळ विजेचा लपंडाव सुरू होता, तर उल्हासनगर शहरातही पावसाची रिपरिप सुरूच होती.

शहापूर, मुरबाडमध्ये प्रमाण कमीच

जिल्ह्य़ातील शहरी भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असला तरी शहापूर आणि मुरबाड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्या २४ तासांत शहापूर आणि मुरबाड तालुक्यात अवघा ३० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली नाही.