भगवान मंडलिक

महामार्गावरील वाहतुकीचा भार अंतर्गत रस्त्यांवर येऊन शहरातील दळणवळण व्यवस्थेत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. मुंब्रा बाह्य़वळण रस्ता मध्यंतरीच्या काळात दुरुस्ती कामासाठी बंद असल्याने ठाणे शहरातील वाहतुकीचे नियोजन बिघडले होते. आता गेल्या आठवडय़ात हा रस्ता वाहतुकीला खुला झाला, पण जुना पत्री पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने कल्याणमधील वाहतुकीवर प्रचंड ताण आहे.

ठाणे जिल्ह्यच्या ठाणे, भिवंडी, कल्याण परिसराचा विचार केला तर या भागातून मुंबई-नाशिक (एनएच-३), ठाणे-कल्याण-माळशेज (एनएच २२२), ठाणे-शिळफाटा-पुणे महामार्ग गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अंतर्गत या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. या रस्त्यांना जोडून शहरांतर्गत येणारे पोहोच रस्ते जिल्हा, पालिकांच्या अखत्यारित आहेत. महामार्गाचे रस्ते आणि जिल्हा, शहरांतर्गत येणारे रस्ते बांधण्याचे वेगवेगळे तंत्र आणि नियमावली आहे. त्याप्रमाणे ते तयार केले जातात. महामार्गावरून सर्व प्रकारच्या वाहतुकीबरोबर जड, अवजड वाहतूक गृहीत धरलेली असते. शहरांतर्गत, जिल्हा रस्त्यांवरून जड, भाजीपाला, किराणाभुसारसारखी नियमित वाहनांची ये-जा होत असते. या वाहनांच्या धाव क्षमतेप्रमाणे त्या रस्त्यांचे आयुष्य असते. पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागांना वर्षांतून दोन ते तीन वेळा खड्डे व इतर देखभाल दुरुस्तीची कामे करावी लागतात. महामार्ग विभाग त्यांच्या मगदुराप्रमाणे खड्डे आणि देखभाल दुरुस्तीची कामे करतो. या देखभालीसाठी दोन्ही विभागांनी स्वतंत्र आर्थिक तरतुदी केलेल्या असतात.

मुंब्रा बाह्यवळण रस्ता दुरुस्तीसाठी गेले चार महिने बंद होता. गणेशोत्सवापूर्वी तो खुला करण्यात आला. या काळात या महामार्गावरील वाहतूक जिल्हांतर्गत महत्त्वाच्या शिळफाटा-कल्याणमार्गे भिवंडी महामार्गाच्या दिशेने वळविण्यात आली होती. शिळफाटा कल्याण रस्ता महामार्ग नाही. ज्या रस्त्यावरून पाच ते १० टनापर्यंतची वाहतूक गृहीत धरून रस्त्याची बांधणी केलेली असते, त्या रस्त्यावरून २४ ते २८ चाकी ८० ते ९० टनाची अवजड वाहने धावूलागली तर हे रस्ते उखडले जाणारच. या रस्त्यावरील पत्रीपुलाची क्षमता १० टन वजनाचे वाहन सहन करील एवढी आहे. त्या पुलावरून अवजड वाहने धावू लागली तर या दणक्यांनी रस्त्यांची दुर्दशा होऊन पुलाचे आयुष्यही घटण्यास सुरुवात होणार.

कल्याण पश्चिमेत गांधारे पूल ते भिवंडी (पडघा) दरम्यानचा १० ते १२ किलोमीटर रस्ता ‘पीडब्ल्यूडी’च्या अखत्यारीत येतो. कल्याण, डोंबिवलीतील भिवंडी, पडघा, नाशिक, शहापूरकडे जाणाऱ्या वाहनांना हा मधला मार्ग सोयीस्कर आहे. या रस्त्यावरून नाशिक, गुजरातकडून येणारी अवजड मालवाहू वाहने ठाणे, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल चुकविण्यासाठी पडघा-गांधारे रस्त्याने कल्याणमध्ये येतात आणि शिळफाटा रस्त्याने निघून जातात. या वाहनांमुळे गांधारे-पडघा रस्त्याची धूळदाण उडालेली असते. सार्वजनिक बांधकाम विभागाची या रस्त्याच्या देखभालीसाठी जो निधी असतो, त्याच्या दुप्पट रक्कम खर्च होते.

कोकणातून येणारी बहुतेक अवजड मालवाहू वाहने तळोजा-खोणीमार्गे नाशिक, मध्य, उत्तर भारतात जाण्यासाठी कर्जत, मुरबाड, सरळगाव, किन्हवली, शेणवा ते शहापूर मार्गे महामार्गाने पुढचा प्रवास करतात. या आडमार्गामुळे ही वाहने टोल चुकवितात. पोलिसांच्या गस्ती पथकांना गुंगारा देतात आणि निधरेकपणे प्रवास करतात. कर्जत ते शहापूपर्यंतचे सर्व रस्ते जिल्हा मार्ग आहेत. या रस्त्यांचे नियोजन ‘पीडब्ल्यूडी’कडे आहे. गावोगावचे जिल्हा रस्ते बैलगाडी, रिक्षा, मोटार गाडी आदी तुलनेने हलक्या वाहनांसाठी असतात. अशा रस्त्यांवरून अवजड वाहने सतत धावू लागली तर त्या रस्त्यांची चाळण होते. हा सगळा त्रास स्थानिक रहिवासी, व्यापारी, उद्योगांना भोगावा लागतो. अवजड वाहन जिल्हा रस्त्याने आले म्हणून त्याला अडविण्याची मुभा पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही रस्ता प्राधिकरणांकडे नाही. परिणामी ‘आवो जावो घर तुम्हारा’ या अवजड वाहनांच्या वृत्तीमुळे स्थानिक रस्त्यांची दुर्दशा होत आहे.

भिवंडी, वाडा, मुरबाड, शहापूर तालुका अंतर्गत रस्त्यांचे जाळे सुखकर प्रवासासाठी योग्य आहे. या रस्त्यांची वाट लावण्याचे काम सध्या अवजड वाहनांनी सुरू केले आहे. कल्याणमधून बिर्ला महाविद्यालय मार्ग माळशेज घाटाकडे २२२ क्रमांकाचा महामार्ग गेला आहे. कल्याणमध्ये या रस्त्याच्या सेवा रस्त्यांवर पालिकेने इमारतीचे बांधकाम आराखडे मंजूर केले आहेत. या रस्त्याला सेवा रस्ता नसल्यामुळे आणि पालिकेच्या चुकीच्या निर्णयामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्याची बांधणी करूनही महामार्ग विभाग हा रस्ता पालिकेकडून हस्तांतरित करून घेण्यास तयार नाही. हा रस्ता पूर्णपणे महामार्ग विभागाच्या अखत्यारित असताना, पालिकेने कारण नसताना या रस्त्यावर बिर्ला महाविद्यालय परिसरात सीमेंट रस्त्याचे प्रयोजन करून कोटय़वधीची उधळपट्टी केली.

स्थानिक रहिवाशांना जिल्हा, शहरांतर्गत रस्ते हे सुस्थितीत असावेत यासाठी पालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, ‘एमएसआरडीसी’, ‘एमएमआरडीए’ आपल्या परीने प्रयत्न करतात. रस्ते कर, टोल माध्यमातून स्थानिक रहिवासी, वाहनचालकांकडून शुल्क घेऊन चांगली रस्ते सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी अमूक रस्ता दुरुस्त, तमूक उड्डाण पूल दुरुस्तीसाठी वाहतूक वळवून अन्य शहरांमधील रस्ते, तेथील जनजीवन विस्कळीत करण्याचे प्रकार यापुढे किती काळ चालणार? या अवजड वाहनांनी शहरांतर्गत, जिल्हा रस्त्यांची जी धूळदाण केली, तो खर्च स्थानिक प्रशासन यंत्रणांवर दुपटी-तिपटीने पडणार. तो भार पुन्हा प्रवाशांवर पडणार. निकृष्ट रस्ते, निकृष्ट पुलांची रडतखडत उभी राहिलेली महामार्गावरील कामे हे दुष्टचक्र सुरूच राहणार!