वाहतूक बदल, मुसळधार पाऊस आणि विसर्जन मिरवणुकांचा फटका

ठाणे : दीड दिवसांच्या गणेशाच्या विसर्जनासाठी शहरातील वाहतूक मार्गात लागू केलेले बदल, रस्त्यांवर निघालेल्या विसर्जन मिरवणुका आणि मुसळधार पाऊस यामुळे शहरातील विविध मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र मंगळवारी सायंकाळी पाहायला मिळाले. घोडबंदर येथील गायमुख, कोपरी पूल, कळवा नाका, खारेगाव पथकर नाका या भागात वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

ठाणे शहरात दीड दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी विसर्जनस्थळांच्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीला प्रवेश बंद केला होता. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली होती. मात्र या पर्यायी मार्गावर वाहनांचा भार वाढून अनेक ठिकाणी कोंडी झाली. असे असतानाच शहरातील रस्त्यांवर निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि त्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात साचलेले पाणी यामुळे कोंडीत अधिक भर पडली.

घोडबंदर मार्गावरील गायमुख येथे सखल भागात पाणी साचल्यामुळे दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ८.३० या कालावधीत ७१.०९ मिमी पावसाची शहरात नोंद करण्यात आली.

मुसळधार पावसामुळे गोखले रोड, नौपाडा या परिसरातील अंतर्गत मार्गावरही अनेक सखल भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. कळवा येथील पारसिक रेतीबंदर भागात वाहतूक बदल लागू करण्यात आल्यामुळे खारेगाव पथकर नाका परिसरातील वाहतूक अतिशय संथ झाली होती. तसेच या वाहतूक बदलाचा फटका मुंबई नाशिक महामार्गालाही बसला.

परिणामी खारेगाव ते मानकोली उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. गणेशोत्सवानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या आणि लागोपाठ आलेल्या तीन दिवसांच्या सुट्टीनंतर घरी परतणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचा लोंढा मार्गावर वाढल्याने आनंदनगर पथकर नाका ते नितीन कंपनी जंक्शन दरम्यान ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.