सिद्धार्थ खांडेकर, ठाणे

ठाण्यात राहून नवी मुंबईत नोकरी करणाऱ्यांकडे असूयेने पाहण्याचे दिवस आता संपले. ठाण्याहून कळव्यामार्गे नवी मुंबईत शिरायचे झाल्यास किमान दीड ते अडीच तास, ऐरोलीमार्गे नवी मुंबईत शिरायचे झाल्यास दीड-पावणेदोन तास..! आणि या वेळा दुपारच्या आहेत. मग सकाळी ‘पीक अवर’च्या काळात किती वेळ लागत असेल, याची कल्पनाही करवत नाही. मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामामुळे अवजड वाहने या पट्टय़ात वळवली गेली. पण याचा मोठा फटका या भागात स्वतच्या वाहनांनी प्रवास करणाऱ्या नोकरदारांना आणि बडय़ा अधिकाऱ्यांनाही बसू लागला आहे.

ठाणे-बेलापूर रस्त्यावर ऐरोलीतील अनेक आयटी कंपन्या, महापे आणि रबाळे औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या, रिलायन्स किंवा बेलापूरमधील अनेक सरकारी किंवा खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी ठाण्याहून किंवा कळव्याहून स्वतच्या वाहनाने किंवा ओला-उबरसारख्या माध्यमातून प्रवास करणे हे दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि अंधेरी एमआयडीसीला जाण्यापेक्षा कितीतरी अधिक सुकर आणि जवळचे असायचे. मुंबई-ठाणे-नवी मुंबई-कल्याण-डोंबिवली-वसई-विरार पट्टय़ात नोकरी किती पगाराची आहे यापेक्षाही नोकरीचे ठिकाण किती जवळ किंवा दूरचे आहे हा मुद्दा अधिक प्रतिष्ठेचा किंवा नैराश्याचा ठरतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत असली, तरी ती कधीही कोलमडण्याचा धोका असतो. पाऊस, तांत्रिक बिघाड, मोर्चे-आंदोलने असे कोणतेही कारण हल्ली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्यासाठी पुरेसे ठरते. यात सर्वाधिक भरडला जातो तो नोकरदार वर्ग. आयटी आणि संबंधित कंपन्यांमध्ये किमान घरून काम करण्याची तरी सोय असते. पण इतर उद्योगांमध्ये ती सोय अजूनही अभावानेच दिसून येते. ठाणे-बेलापूर पट्टय़ात मात्र तुलनेने वाहतुकीची कोंडी किंवा पावसामुळे पाणी साचून अघोषित संचारबंदी किंवा ट्रान्स हार्बर विस्कळीत होणे फारसे व्हायचे नाही. गेल्या २९ ऑगस्टला प्रचंड पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही लोकल सेवा ठप्प झाल्या, तरी ट्रान्स-हार्बर सेवा सुरळीत होती. रस्त्यांची योग्य रुंदी आणि वाहतूक नियोजनामुळे ठाण्याहून मुंबईपेक्षा नवी मुंबईचा प्रवास जवळचा आणि सोईस्कर ठरत असे. अधिक सुनियोजित ‘बिझिनेस डिस्ट्रिक्ट’मुळे या ठिकाणी नोकरी करणेही आनंददायी व्हायचे.

हे चित्र आता विविध कारणांमुळे विस्कटू लागले आहे. प्रथम कोपरी पुलावरची कोंडी आणि आता बहुतेक सर्व नाक्यांवर आणि चौकांमध्ये होणाऱ्या कोंडीने रौद्ररूप धारण केले आहे. टोल द्यावा लागत नाही म्हणून कळव्यामार्गे जायची सोय राहिलेली नाही. साकेतमार्गे कळवा नाका चौकात यायचे तर तिथे कोंडी. तिथून कळवा चौकात तर कोंडी असतेच. तिथून पुढे पटणी जंक्शन, ऐरोली रेल्वे स्थानक, तेथून पहिला सिग्नल आणि रबाळे नाक्यावरचा दुसरा सिग्नल या ठिकाणी वाहतूक संथ गतीनेच सरकते. या चौकातून हुश्श करून पुढे सरकावे, तर एल अँड टी आणि घणसोली रेल्वे स्थानक उड्डाणपुलावर अवजड वाहनांमुळे पुन्हा एकदा मोटारीला ब्रेक लागतोच. पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका आणि ऐरोली येथे टोल भरून ऐरोलीमार्गे ठाणे-बेलापूर रस्त्याला लागावे तर हल्ली मुलुंड टोलनाक्यावर दिवस, रात्र आणि मध्यरात्रीही प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.

त्यामुळे मासिक पास काढून स्वतच्या वाहनाला ईटीसी चिन्हांकित करून घेणे हा विनोद ठरू लागला आहे! ऐरोली टोलनाक्यावरून पूल ओलांडून ऐरोलीत शिरले, की दोन सिग्नलचे अडथळे ओलांडून ठाणे-बेलापूर रस्त्याकडे लागावे, तर त्या रस्त्यावरून ऐरोलीत शिरणारी वाहने या रस्त्याला छेद देतात. या अत्यंत महत्त्वाच्या चौकात किमान दोन बाजूंकडून येणाऱ्या वाहनांना नियंत्रित करू शकेल, असा वाहतूक विभागाचा पोलीस किंवा होमगार्डही हजर नसतो. त्यामुळे ऐरोलीच्या मुख्य रस्त्यावरील दुसरा सिग्नल हिरवा झाला, तरी काहीच फरक पडत नाही. या कोंडीमुळे  ऐरोली शहरात एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांचीही कोंडी होतेच. ऐरोलीमार्गे पटणी जंक्शनकडे अवजड वाहने वळवून घेण्याची पूल संपल्यानंतरच्या सर्कल परिसरात वाहतूक पोलिसांचा ताफा हजर असतो. पण त्यातील एखादा पोलीस या रस्त्याच्या ठाणे-बेलापूर रस्त्याकडून टोकाजवळ उभा केला, तरी थोडय़ा प्रमाणात कोंडी सुटू शकेल.

अशा परिस्थितीत नवी मुंबईकडून ठाण्याकडे येताना, द्रुतगती मार्गावरील टोलनाक्याऐवजी एलबीएस मार्गावरील टोलनाक्यामार्गे ठाण्यात शिरणे किंवा याविरुद्ध प्रवास हाच मार्ग उरतो. पण तो अधिक दूरचा आहे आणि तिथेही कोंडीची शक्यता असतेच. या सगळ्या परिस्थितीत ठाण्याहून नवी मुंबईकडे जायचे कसे, ही चिंता किंवा चिंतन अधिक गंभीर होऊ लागले आहे!