प्रशिक्षणार्थीची वाहने, रस्त्यांवरील म्हशींमुळे डोंबिवलीत वाहतूक कोंडी

डोंबिवली : गर्दीच्या वेळेत नवीन चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रांची वाहने डोंबिवली पूर्व भागात मुख्य रस्त्यावर आणली जातात. ही वाहने हळू चालवली जात असल्याने पाठीमागून येणारी वाहने अडकून पडतात. यामुळे ठाकुर्ली पुलावर दररोज मोठी कोंडी होऊ लागली आहे. याशिवाय म्हशींचे कळप शहरात रस्त्यावर येत आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे.

ठाकुर्ली, चोळे भागातून या म्हशी पेंडसेनगर किंवा पाथर्ली नाक्यावरून शहरात प्रवेश करतात. कचराकुंडय़ांच्या ठिकाणी टाकलेला सडका भाजीपाला व इतर खुराक त्यांना जागीच मिळत असल्याने माळरानावर चरण्याऐवजी या म्हशी शहरात येत असाव्यात असा अंदाज आहे.  संध्याकाळच्या वेळेत या म्हशी फडके रस्ता, सावरकर रस्ता, नेहरू मैदान रस्ता, पाथर्ली नाका किंवा पेंडसेनगर गल्लींमध्ये कळपाने येतात. म्हशी अतिशय संथगतीने चालत असल्याने त्या वेगाने वाहनचालकाला वाहन चालवावे लागते. म्हशींमुळे होणारा वाहन खोळंबा कायम असताना आता नवीन वाहनचालकांना प्रशिक्षण देणाऱ्या मोटार वाहन प्रशिक्षणाचा तापही प्रवाशांना होऊ लागला आहे. काही जुन्या रिक्षाचालकांनी मोटार वाहन प्रशिक्षण केंद्र सुरू केली आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रांचे नियम पायदळी तुडवून ही केंद्र शहरात सुरू करण्यात आली आहेत, अशा तक्रारी आहेत. काही मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रांची वाहने भर रस्त्यात उभी असतात. टिळक चौक पुतळा, टंडन रस्ता बिर्याणी कॉर्नर समोर मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रांची पाच ते सहा वाहने भर रस्त्यात उभी असतात. सागाव, सागर्लीमध्येही अशीच परिस्थिती आहे. ही वाहने चालकाला प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य रस्त्यावर आणली जातात. कोपर उड्डाण पूल बंद असल्याने ही वाहने मानपाडा, केळकर रस्ता, फडके रस्ता, ठाकुर्ली उड्डाण पूल भागातून नेली जातात. प्रशिक्षणार्थी वाहनचालक अतिशय मंद गतीने अथवा अडखळत वाहने चालवीत असतात. गर्दीच्या वेळेत हे प्रशिक्षण दिले जात असल्याने आधीच कोंडीत सापडलेल्या रस्त्यांवर आणखी कोंडी होऊ लागली आहे.

 

सावरकर रस्त्यावर फिरत असलेला म्हशींचा कळप.